महाड एमआयडीसीतील खड्डे भरण्यास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने सुरुवात केली आहे.

महाड (बातमीदार) : महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने सुरुवात केली आहे. ‘सकाळ’ने एमआयडीसीतील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचे वृत्त प्रसिद्ध करताच याची तातडीने दखल घेत खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

महाड एमआयडीसीमधील मुख्य रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते. सुदर्शन कंपनी, देशमुख कांबळे फाटा ते थेट बिरवाडीपर्यंत हे खड्डे होते. सीईटीपीसमोर वाहने चालवणेही अवघड होते. याशिवाय सिक्वेंट कंपनीसमोरील अर्ध्या किलोमीटर रस्त्यावर सहा ते सात फूट रुंदीचे खड्डे पडलेले आहेत. बिरवाडी आणि परिसरातील नागरिक, तीनचाकी रिक्षा, मिनीडोर, एसटी बसेस, मालवाहू लहान वाहने याच मार्गावरून ये-जा करत असतात. दुचाकीस्वारांना तर हा प्रवास हाडे खिळखिळी करणारा असायचा. त्यातच अवजड वाहनांनी खड्डे वाढतच होते; परंतु प्रशासनाला जाग येत नव्हती. अखेर ‘सकाळ’ने याबाबत ११ सप्टेंबरच्या अंकात आवाज उठवल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून खड्डे भरण्यास सुरुवात झाली. सुदर्शन कंपनीसमोर, तसेच सर्व ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. रस्ते देखभाल दुरुस्तीच्या निविदाही एमआयडीसीने प्रसिद्ध केल्या आहेत.

या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले होते. मोठमोठे खड्डे बुजवले जात नव्हते. वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर प्रशासन जागे झाले आणि खड्डेही भरले जात आहेत.
- मदन शिरशिंगे, वाहनचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Start of filling of pits in area of Mahad MIDC