राज्यातील महिलांशी भाजप साधणार संवाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त सोशल मीडियाचा वापर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त सोशल मीडियाचा वापर
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व यशाची पुनरावृत्ती करणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आवश्‍यक असल्याने भाजपने सध्या नव्या माध्यमांचा वापर करून प्रचारयंत्रणा मजबूत करण्याचे ठरवले आहे. भाजपच्या वॉररूमने संपर्काची नवनवी माध्यमे शोधण्यावर भर दिला असतानाच राज्यातील महिलांपर्यंत पोचण्यासाठी व्हॉट्‌सऍप, तसेच फेसबुकचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार अभियानाची धुरा सांभाळणाऱ्या देवांग दवे यांनी सोशल मीडियाच्या साइटवरून महिलांशी संपर्क साधण्याची मोहीम आखली आहे.
 

भाजपच्या महिला मोर्चातर्फे प्रत्येक तालुक्‍यात एकेका कार्यकर्तीला सोशल नेटवर्किंग साइटशी संपर्क साधण्याचा निरोप देण्यात आला आहे. महिलांपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गाचा अवलंब केला जाईल. या मोहिमेचा पहिला भाग म्हणून शालेय मुलांच्या मातांना परस्परांशी जोडण्यासाठी व्हॉट्‌सऍपपर्यंत प्रथम पोचले जाईल. महापालिका तसेच नगरपालिका निवडणुकीत नागरी भागातील गृहनिर्माण सोसायट्यांनी वापरात आणलेल्या व्हॉट्‌सऍपचा मोठा वापर केला जाईल. या माध्यमातून मोदी सरकारने, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली जाईल. कौटुंबिक घरगुती तसेच पालकवर्गाने तयार केलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर क्‍वचितप्रसंगी का होईना; पण सरकारी निर्णयांबद्दल भाष्य केले जाते. अशा माध्यमांवर भाजपशी संबंधित महिलांनी तयार केलेले संदेश जावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
 

महिलावर्ग फेसबुकवर अत्यंत मोठया प्रमाणात सक्रिय झाला असल्याचे नमूद करत भाजप प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी म्हणाल्या, की महिला सरकारच्या कामगिरीची जाहीरपणे चिकित्सा करत नाहीत; पण सध्या घडणाऱ्या बदलांची त्या चोख नोंद घेत असतात. या महिलांपर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोतच शिवाय देश उभारणीच्या कामात महिलांचा सहभाग मोठा असावा ही भाजपची विचारसरणीही त्यानिमित्ताने आम्ही समाजात पोचविणार आहोत.
महाराष्ट्रात महिलांचे मतदानासाठी बाहेर पडण्याचे प्रमाण वाढावे, यासाठीही प्रयत्न होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महिलांसाठी 33 टक्‍के जागा आरक्षित आहेत. राजकारणासाठी घराबाहेर पडलेल्या महिला आता सार्वजनिक आयुष्यात रुळल्या आहेत. त्यामुळे महिला संपर्काची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली जाईल, असेही श्‍वेता शालिनी यांनी नमूद केले. महिलांना माहिती देणारे वेगवेगळे उपक्रम हाती घेतानाच महिलांच्या राजकारणातला सहभाग वाढावा, यासाठी प्रयत्न केले जातील. सोशल मीडियावर प्रत्येक पक्ष लक्ष देत असला तरी संपूर्णतः महिलांसाठी काम करणारी स्वतंत्र यंत्रणा उभी करणारा भाजप एकमेव पक्ष मानला जातो. येणाऱ्या काळात माध्यमांवरील सहभाग हा राजकीय वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहेच, अधिकाधिक महिला त्यात सहभागी व्हाव्यात, यावर सध्या भर दिला जाणार आहे.

Web Title: State BJP likely to women with