पनवेलमध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

नाट्यचळवळ वृद्धिंगत करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘अटक करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या प्रतिष्ठित स्पर्धेची प्राथमिक फेरी १४ व १५ डिसेंबर रोजी निघोजकर मंगल कार्यालय, निघोज, पुणे आणि १९ ते २२ डिसेंबरदरम्यान पनवेल येथील चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालयात होणार आहे.

नवी मुंबई : नाट्यचळवळ वृद्धिंगत करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘अटक करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या प्रतिष्ठित स्पर्धेची प्राथमिक फेरी १४ व १५ डिसेंबर रोजी निघोजकर मंगल कार्यालय, निघोज, पुणे आणि १९ ते २२ डिसेंबरदरम्यान पनवेल येथील चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालयात होणार आहे. अंतिम फेरी ३ व ४ जानेवारीला पनवेल शहरातील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत ही स्पर्धा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि सीकेटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. या स्पर्धेचे ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही एकांकिका स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकिका’ स्पर्धेचा प्रारंभ केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या एकांकिकेला १ लाख रुपयांच्या बक्षिसासह ‘अटल करंडक’, द्वितीय क्रमांकाला ५० हजार, तृतीय २५ हजार आणि चतुर्थ क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजनेसाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार असून, प्राथमिक फेरीतील सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शामनाथ पुंडे (९८२१७५८१४७), संकेत मोडक (८४११८४५४५५), गणेश जगताप (९८७०११६९६४), अमोल खेर (९८२०२३३३४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन 
आयोजकांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State level one act play competition in Panvel