केईएममधील स्टेण्टची किंमत रास्तच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - ऍन्जिओप्लास्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेण्टच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मात्र त्यासाठी जास्त पैसे घेतले जातात, या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई - ऍन्जिओप्लास्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेण्टच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मात्र त्यासाठी जास्त पैसे घेतले जातात, या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

केईएमविरोधात निनावी तक्रारी आल्यानंतर औषध व अन्न प्रशासनाने (एफडीए) केईएम रुग्णालयातील अशी 22 प्रकरणे तपासली. त्यात एकाही प्रकरणात जास्त पैसे घेतल्याचे आढळले नाही, असे एफडीएच्या सहआयुक्त विनीता थॉमस यांनी सांगितले.

निनावी तक्रार आल्याने केईएम रुग्णालयात 14 फेब्रुवारीपासून झालेल्या ऍन्जिओप्लास्टी शस्त्रक्रियेची कागदपत्रे पडताळण्यात आली. या सर्व शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत करण्यात आल्या होत्या. योजनेतील अटी-शर्तींचे पालन करूनच स्टेण्टची विक्री करण्यात आल्याचे थॉमस यांनी सांगितले. लिलावती रुग्णालयातूनही अशा प्रकारची तक्रार आली होती. तेथील 40 प्रकरणे तपासण्यात आली. त्यातही रुग्णालयाने स्टेण्टसाठी जास्त पैसे दिल्याचे आढळले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्टेण्टच्या किमती कमी झाल्यानंतर एफडीएकडे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. तक्रारदार नाव, संपर्क क्रमांक देत नाहीत. त्यामुळे तक्रारींची शहानिशा करण्यासाठी सर्व प्रकरणे तपासावी लागतात, अशी माहिती एफडीएतील सूत्रांनी दिली.

आरोग्यदायी योजनेतून होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाला बिल देण्यात येत नाही. महिन्याच्या शेवटी बिलिंगचे काम पूर्ण होते. स्टेण्टसाठी 29 हजार 600 रुपयांची कॅप ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जास्त पैसे घेणे शक्‍य नाही.
- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम

Web Title: stent rate reasonabla in kem hospital