सावत्र आईने मुलीला साडेसहा लाखांना विकले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

नालासोपारा - राजस्थानमधील 14 वर्षांच्या मुलीला चार महिन्यांपूर्वी सावत्र आईने साडेसहा लाखांत विकल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील संतोष भुवन परिसरातील किराणा दुकानदार लाच्चाराम चौधरी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अत्याचाराला कंटाळलेल्या मुलीने संधी मिळताच पळ काढला आणि तुळींज पोलिस ठाण्यात सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. तिची सावत्र आई आणि इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक राजस्थानला पाठविले आहे. 

राजस्थानमधील रंगम पाली जिल्ह्यातून लाच्चारामने या मुलीला खरेदी केले होते. यासाठी तिच्या सावत्र आईशी साडेसहा लाखांचा सौदा झाला होता. त्याने या मुलीला नालासोपाऱ्यात आणले. तिच्यावर तो वारंवार अत्याचार करू लागला. याबाबत कुणाला सांगू नये म्हणून तिला दुकानात डांबून ठेवले होते. त्याच्या अत्याचारांना कंटाळलेल्या या मुलीने संधी मिळताच पळ काढला आणि पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना सर्व प्रकार सांगितल्यावरून लाच्चारामला अटक केली आहे.

याआधीही दोनदा विकले
या मुलीला वडील नाहीत. तिच्या पालनपोषणाची जबाबदारी सावत्र आईवर आल्याने या मुलीला विकले, असे सहायक पोलिस निरीक्षक नजीब इनामदार यांनी सांगितले. तिला याआधीही दोन वेळा 50 हजार आणि पाच लाखांना विकण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती या मुलीने दिली आहे. या मुलीचे वय 20 वर्षे असल्याचे सांगून तिच्या आईने लग्न लावून दिल्याचे आरोपी लाच्चाराम चौधरी यांनी पोलिसांना सांगितले. 

Web Title: Step mother sold her daughter 6.5 lakh