खारघर येथे तरुणाने केले भटक्‍या श्वानावर लैगिंक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019


संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्वयंसेवी संघटनांनी पोलिसांना त्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

नवी मुंबई : खारघर सेक्‍टर-4 भागातील एका ढाब्यामध्ये काम करणारा तरुण त्याच भागातील एका भटक्‍या श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

संबंधित प्रकार हा खारघर भागातील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला व त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल केला. हा प्रकार स्वयंसेवी संघटनेच्या निदर्शनास आल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबतची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी सदर तरुणावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी; तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

या घटनेतील आरोपी तरुणाचे नाव मुनमुन कुमार (20) असे असून तो खारघर सेक्‍टर-4 मधील "संधु दा ढाबा' या ढाब्यामध्ये कामाला आहे. मुनमुन कुमार हा तरुण ढाब्यामध्येच वास्तव्यास असून तो मुळचा बिहारचा आहे. 14 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास काही विद्यार्थी व विद्यार्थिनी सेक्‍टर-4 मधील आपल्या मित्राच्या रूमवर जेवणासाठी एकत्र आले होते. जेवण झाल्यानंतर सर्व जण पहाटे 2 वाजेपर्यंत गप्पा मारत बसले होते. याच वेळी एक विद्यार्थिनी गॅलरीमध्ये आली असताना रस्त्यावर एक तरुण भटक्‍या श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यामुळे सदर विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना दिल्यानंतर या विद्यार्थ्यांनी सदर तरुणाचा श्वानासोबत अश्‍लील कृत्य करत असतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलवर शूट केला व सोशल मीडियावर टाकून दिला.

सदर व्हिडीओ प्राण्यांशी संबंधित असलेल्या 'पेटा' या संस्थेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वयंसेवी संघटनेसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना याबाबत अधिक माहिती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विजय रंगारे यांनी सेक्‍टर-4 मध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सदरचा व्हिडीओ काढला त्यांचीदेखील भेट घेतली.

त्यानंतर सर्व प्रकारात तथ्य असल्याचे लक्षात येताच विजय रंगारे यांनी खारघर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी मुनमुन कुमार याच्यावर श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य व मुखमैथुन करणे; तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

पीडित श्वान रुग्णालयात दाखल 

या घटनेतील आरोपी मुनमुन कुमार हा ज्या कुत्र्यासोबत गैरकृत्य करत होता, त्या भटक्‍या श्वानाला तो दरदिवशी ढाब्यातील शिल्लक राहिलेले अन्न खायला द्यायचा, त्यामुळे सदर श्वान त्याच्या चांगला ओळखीचा झाला होता. याचाच फायदा उचलत त्याने सदर कुत्र्यासोबत अश्‍लील व अनैसर्गिक कृत्य केल्याचे तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी या श्वानाचा शोध घेऊन त्याला वैद्यकीय उपचारासाठी परळ येथील प्राण्यांच्या रुग्णालयात पाठवून दिले आहे. 

पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास दिला होता नकार 

या घटनेतील स्वयंसेवी संघटनेचे कार्यकर्ते विजय रंगारे हे संबंधित प्रकाराची खारघर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास गेले असता, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे रंगारे यांनी थेट पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या खारघर पोलिसांनी बुधवारी या प्रकरणातील तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stray dog raped by a man in navi mumbai