स्मार्ट सिटीतील रस्ते झाले खड्डेमय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नवी मुंबई शहरातील ठाणे-बेलापूर महामार्गासह एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील रस्ते मागील महिनाभरापासून संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे खड्डेमय झाले आहेत.

मुंबई ः नवी मुंबई शहरातील ठाणे-बेलापूर महामार्गासह एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील रस्ते मागील महिनाभरापासून संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे खड्डेमय झाले आहेत. पावसाळा सुरू होण्याअगोदर रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून या खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; मात्र ही डागडुजी फोल ठरल्याने नवी मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे अक्षरशः कंबरडे मोडले असून, अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रस्त्यांवरील सर्वाधिक खड्ड्यांचा फटका एमआयडीसी क्षेत्रातील असणाऱ्या पाच ब्लॉकमधील कळवा ब्लॉकला बसला आहे. कळवा ब्लॉकमधील असणाऱ्या ऐरोली नॉलेज पार्क रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. एमआयडीसीच्या असणाऱ्या महापे ते मुकंद कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर दीड किलोमीटर रस्त्याचे काम यादवनगरमध्ये रखडल्यामुळे या रस्त्यांना जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.

औद्योगिक क्षेत्रातील रबालेमध्येही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याशिवाय महापे, तुर्भे, शिरवणे येथील एमआयडीसी भागातील रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे एमआयडीसी भागात येणाऱ्या कामगारांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून एखादे वाहन गेले असता पायी जाणाऱ्या कामगारांची डबक्‍यातील पाण्याने आंघोळ होते. औद्योगिक क्षेत्रात गटार योजना न राबवल्याने डोंगरातून येणारे सर्व पाणी औद्योगिक वसाहतीत जमा होत आहे. याचा त्रास कंपनीचालकांना होत आहे. 

सततच्या पावसामुळे औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तत्काळ हे खड्डे बुजवण्यात येतील.
- एस. एम. कलकुटकी, कार्यकारी अंभियता, एमआयडीसी.

पालिकेच्या विभाग कार्यालयांतर्गत खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत खड्डे बुजवण्यात येत आहेत. पाऊस थांबल्यानंतर तत्काळ हे खड्डे बुजवण्यात येतील.
- सुरेंद्र पाटील, शहर अंभियता, नवी मुंबई महापालिका.

एमआयडीसी क्षेत्रात संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. एमआयडीसी प्रशासनाला खड्डे बुजवण्यासाठी विनंती करण्यात येईल.
- के. आर. गोपी, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अध्यक्ष.

शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालवणे जिकिरीचे होत आहे. खड्ड्यांमुळे अक्षरशः वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ खड्डे बुजवावेत.
- इंद्रजित जाधव, वाहनचालक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The streets of Smart City are rocky