चेंबूर येथे जमावाचा उद्रेक 

मुंबई ः अपहृत मुलीच्या पित्याच्या अंत्यसंस्कारात सहभागी नागरिकांनी चेंबूरमध्ये रास्ता रोको करत पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. जमावाने पोलिसांनाही मारहाण केल्याने अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला. 
मुंबई ः अपहृत मुलीच्या पित्याच्या अंत्यसंस्कारात सहभागी नागरिकांनी चेंबूरमध्ये रास्ता रोको करत पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. जमावाने पोलिसांनाही मारहाण केल्याने अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला. 

मुंबई : नेहरूनगर येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करूनही पोलिसांनी दखल न घेतल्याच्या भावनेमुळे निराश झालेल्या पित्याने मागील रविवारी (ता. 13) लोकलखाली आत्महत्या केली. या मुलीचा अद्याप शोध न लागल्यामुळे मंगळवारी (ता. 22) चेंबूर येथे स्थानिकांचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले; तसेच एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहा कर्मचारी जखमी झाले. ठिय्या आंदोलन करणाऱ्या जमावाने पोलिसांना मारहाण केल्याचेही सांगण्यात आले. 

ठक्कर बाप्पा वसाहत परिसरातून सात महिन्यांपूर्वी एका तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तिचे वडील पंचम राठाडिया यांनी नेहरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली; मात्र मुलीचा शोध न लागल्यामुळे त्यांनी निराश होऊन 13 ऑक्‍टोबरला लोकलखाली आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करणे भाग पाडल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती; परंतु या प्रकरणातील आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. राजावाडी रुग्णालयात 10 दिवस ठेवण्यात आलेला त्यांचा मृतदेह मंगळवारी कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. 

राठाडिया यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चरई स्मशनाभूमीत नेला जात असताना अंत्ययात्रेतील काही जणांनी छगन मिठा पेट्रोल पंपानजीक शीव-पनवेल मार्गावर ठिय्या देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. परिणामी परिसरातील वातावरण अधिकच तापले. त्या वेळी झालेल्या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी कुर्ला सिग्नलवर वाहतूक रोखली आणि शीव-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड करत काही पोलिसांनाही मारहाण केली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांनी सांगितले. 
दगडफेकीत वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण तेजोळे गंभीर जखमी झाले असून, सहा पोलिसांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या सर्व जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिस्थिती चिघळल्यामुळे परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

............

सीसी टीव्हीद्वारे हल्लेखोरांचा शोध 
पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसी टीव्ही चित्रीकरणाची मदत घेतली जात आहे. रास्ता रोको आणि दगडफेक करणाऱ्यांत अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे सांगण्यात येते.
 

.........

स्थानिकांमध्ये संताप 
अपहृत मुलीच्या वडिलांना अपहरणकर्त्यांकडून धमकीचे दूरध्वनी येत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांनी आता तरी बेपत्ता मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत. ठक्कर बाप्पा वसाहतीतील व्यावसायिक आणि रहिवाशांनी पोलिसांच्या निषेधार्थ सोमवार व मंगळवारी कडकडीत बंद पाळला होता. स्थानिकांनी मंगळवारी नेहरूनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. त्या वेळी मोर्चेकऱ्यांनी कुर्ला स्थानकाकडे जाणारी वाहतूक अडवली. या जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com