पालघर - सफाळयात बंद, अत्यावश्यक सेवा सुरू 

प्रमोद पाटील
सोमवार, 2 एप्रिल 2018

सफाळे : अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा सुप्रीम कोर्टाने शिथील केल्यामुळे त्यावर पुनर्विचार करण्यासाठी  सोमवारी (ता. 2) पुकारलेल्या पालघर बंदला सफाळयात संमिश्र प्रतिसाद मिळाला. औषधांची दुकाने, दूध, दवाखाने, मच्छी मार्केट, शाळा, बस, रिक्षा वगैरे अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.  

सफाळे : अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा सुप्रीम कोर्टाने शिथील केल्यामुळे त्यावर पुनर्विचार करण्यासाठी  सोमवारी (ता. 2) पुकारलेल्या पालघर बंदला सफाळयात संमिश्र प्रतिसाद मिळाला. औषधांची दुकाने, दूध, दवाखाने, मच्छी मार्केट, शाळा, बस, रिक्षा वगैरे अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.  

पश्चिम रेल्वेच्या मुंबईच्या हाकेवर असलेल्या सफाळे रेल्वे स्थानकावर पहाटे तीन-साडेतीन वाजेपासून शेतकरी, बागायतदार, व्यापारी यांची गर्दी असते. रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला असलेल्या सुमारे 70 ते 80 गावांची सफाळे ही मुख्य बाजारपेठ आहे.येथील मोठ्या प्रमाणात भाजीपाला, मासे, कडधान्ये, फळे, दुध मुंबईत जातात.

नेहमी प्रमाणे सोमवारी सुद्धा मुंबई आणि मुंबई उपनगरात विक्रेते भाजीपाला, दुध आदी घेऊन गेले. मात्र सोमवारी येथे मोठा आठवडा बाजार भरतो. या बाजाराच्या भरोसयावर राहिलेल्यांची पंचायत झाली. सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास आदिवासी एकता परिषद आणि भूमिसेनेच्या कार्यकर्ते गजानन पागी, काशीनाथ वरठा, कृष्णा कांबळे, सुरेश भोईर, बेबी धांगडा, लिला बोके, चंदू दळवी,अरूण हाडळ आदींच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेत मोर्चा काढून व्यापारी वर्गाला दुकानं बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

या वेळी काही व्यापारी आणि मोर्चेकरी यांच्यात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना नसल्याने अचानक बंद पुकारला असल्याने आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते असे व्यापारी वर्गाचे म्हणणे होते. तर बाजारपेठ बंद ठेवून आम्हाला सहकार्य करा असे मोर्चेकरयांचे म्हणणे होते. यामुळे दोघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत बाजारपेठ कडकडीत बंद होती. तदनंतर हळूहळू दुकाने उघडण्यात आली. दरम्यान, बंद काळात या भागात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. 

Web Title: strike in palghar emergency services are continue