मोकळ्या जागेत व्यवसाय करणाऱ्यांना दणका!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

मुंबई : नवी मुंबई शहरातील दुकानांसमोरील मोकळ्या जागेत (मार्जिनल स्पेस) व्यवसाय करणाऱ्या दुकानांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याकरिता शहरातील दुकानांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. महापालिकेची सूत्रे स्वीकारताच मिसाळ यांनी धडाकेबाज कामगिरी करून, शहरातील व्यावसायिकांना दणका देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मार्जिनल स्पेसचा बेकायदा वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

शहरातील सुमारे ३ लाख १६ हजार मालमत्तांपैकी सुमारे ४८ हजार व्यावसायिक मालमत्ता आहेत. यात रहिवासी अधिक व्यावसायिक इमारतींची संख्या पकडली, तर ती अंदाजे दीड लाखांच्या घरात जाते. शहरातील अनेक मोक्‍यावरच्या ठिकाणी इमारतींखाली दुकानांचे नियोजन केले आहे. या दुकानांसमोरील मोकळ्या जागांचा अगदी अधिकाराने दुकानदारांकडून वापर केला जातो. बेलापूर, नेरूळ, सीवूड्‌स, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या भागात मुख्य चौकात स्विट्‌सची आलिशान दुकाने तयार आहेत. 

या दुकानांसमोरील मोकळ्या जागेचा इतर छोटी दुकाने थाटण्यासाठी केला जात आहे. या मोकळ्या जागेत पाणी-पुरीवाला, भुर्जीची गाडी, पावभाजी, पान-टपरी, वडा-पाव आदी पदार्थांच्या विक्रीसाठी छोट्या गाड्या लावून धंदा केला जात आहे. दुकानाबाहेरील या जागेचा वापर केल्याबदल्यात दुकानमालक संबंधितांकडून चांगली भाडेवसुली करतो. बऱ्याचदा सीवूड्‌स, बेलापूर, वाशी, घणसोली, कोपरखैरणे आणि ऐरोलीसारख्या शहरांमध्ये मोक्‍याच्या दुकानांवरील मार्जिनल स्पेसमधील जागेत व्यवसाय केल्यामुळे दुकानदारांना लाखो रुपयांचे भाडे मिळत आहे; परंतु या बेकायदा व्यवसायामुळे महापालिकेच्या महसुलावर विपरीत परिणाम होत आहे. दुकानांच्या जागेनुसार व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना आकारला जातो. तो परवाना देताना महापालिका शुल्क आकारते.

कारवाई थंडावली!
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेचा कारभार हाकताना शहरातील दुकानांसमोरील मार्जिनल स्पेसमध्ये व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई ची मोहीम सुरू केली होती. अतिक्रमण विभागामार्फत रोज होणाऱ्या कारवायांमुळे बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांचे कंबरडे मोडले होते. नंतरचे माजी आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी कारवाईचे सत्र सुरूच ठेवले होते; परंतु मध्यंतराच्या काळात कारवाया थंडावल्याने पुन्हा व्यावसायिकांनी मार्जिनल स्पेसमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली.

शहरातील दुकानांसमोरील मोकळ्या जागा या आपत्कालीन परिस्थिती निवारण करण्यासाठी अथवा ग्राहकांना उभे राहण्यासाठी असते; मात्र या जागेचा जर व्यावसायिक वापर होत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. अशा बेकायदा व्यावसायांवर कारवाई केली जाईल.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strike for those who do business in the marginal space!