ठाण्यातील पार्किंग प्लाझाची रखडपट्टी 

ठाणे : स्थानकाबाहेर रखडलेले पार्किंग प्लाझाचे काम (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : स्थानकाबाहेर रखडलेले पार्किंग प्लाझाचे काम (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : भारतीय रेल्वे तोट्यात धावत असतानाच याचा परिणाम रेल्वेच्या विकासकामांवर होऊ लागला आहे. ठाणे स्थानकातील रेल्वेच्या पार्किंग प्लाझाची अर्धवट इमारत पूर्ण करण्यासाठी निधीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर आले आहे. भूमिपूजन झाल्यानंतर तब्बल साडेचार वर्षे हा प्रस्तावित दुमजली पार्किंग प्लाझा रखडलेला आहे. त्यामुळे स्थानकाबाहेर वाहनचालकांची पार्किंगसाठी मोठी अडचण होत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेकडे आवश्‍यक निधी नसल्याने की रेल्वेच्या अर्थसंकल्पात यासाठी पुरेशी तरतूद केलेली नसल्याने हे काम रखडले आहे? असा सवाल रेल्वे प्रवासी करीत आहेत. 

ठाणे रेल्वेस्थानकातून सुमारे सात लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. उपनगरीय रेल्वेस्थानकांपैकी वर्दळीचे किंबहुना सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकाबाहेर पश्‍चिमेकडे वाहनांच्या पार्किंगसाठी तळ अधिक दुमजली पार्किंग प्लाझाचे भूमिपूजन जून 2015 मध्ये झाले. त्यानंतर तब्बल 5 कोटी 72 लाख खर्चून उभारण्यात आलेल्या या तळमजली वाहनतळाचे उद्‌घाटन 15 जून 2017 ला झाले.

उद्‌घाटनालाच भाजप आणि शिवसेनेत श्रेयवाद उफाळल्याने या वास्तूचे उद्‌घाटन चक्क दोन वेळा करण्यात आले होते. त्यानंतर, पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले. मात्र तब्बल दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटला तरीही पार्किंग प्लाझाच्या उर्वरित बांधकामाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. 

अर्थसंकल्पात ठाणे स्थानकातील पार्किंग प्लाझासाठी निधीची तरतूदच केली नसल्याची बाब रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने उघड केली. एकीकडे प्रवाशांची किंबहुना वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पार्किंगचा प्रश्न बिकट बनत आहे. या संदर्भात रेल्वे वाणिज्य विभागाशी संपर्क साधला असता कुणीही प्रतिसाद दिला नाही. 

  • तळ अधिक दुमजली पार्किंग प्लाझाचे भूमिपूजन जून 2015 ला तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले 
  • वास्तविक 2016 मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. तरीही अर्धवट बांधलेल्या पार्किंग प्लाझाचे उद्‌घाटन 15 जून 2017 ला पार पडले. 

पार्किंगचे दर 
खासगी ठेकेदारामार्फत चालवल्या जाणाऱ्या या पार्किंग प्लाझामध्ये तळमजल्यावर सध्या एक हजारांहून अधिक दुचाकी पार्क केल्या जात असून प्रति वाहन एक तासासाठी 10 रुपये, चोवीस तासासाठी 30 रुपये; तर, प्रति माह 400 रुपये मासिक पास याप्रमाणे दर आकारले जातात. पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले असून या ठिकाणी दुचाकी आणि तळमजल्यावर चारचाकी वाहने पार्क करण्याचे प्रस्तावित आहे; तर वरच्या मजल्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने पार्किंगसाठी वाहनचालक प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com