"स्वप्न साकार'मधील रहिवासी वाऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

बेलापूर - स्ट्रक्‍चरल ऑडीटचा अहवाल आल्याशिवाय नेरूळमधील स्वप्न साकार सोसायटीच्या इमारतीत राहण्यास महापालिकेने मनाई केल्यामुळे तेथील रहिवाशांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नेरूळ सेक्‍टर 23 मधील या सोसायटीत बुधवारी दोन मजल्यांवरील स्लॅब कोसळण्याची घटना घडल्यामुळे तेथील 16 कुटुंबीयांना घरे रिकामी करावी लागली आहेत. महापालिकेने शहरात संक्रमण शिबीर बांधले नसल्यामुळे या कुटुंबांवर नातेवाईकांकडे राहण्याची नामुष्की ओढावली ाहे. 

बेलापूर - स्ट्रक्‍चरल ऑडीटचा अहवाल आल्याशिवाय नेरूळमधील स्वप्न साकार सोसायटीच्या इमारतीत राहण्यास महापालिकेने मनाई केल्यामुळे तेथील रहिवाशांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नेरूळ सेक्‍टर 23 मधील या सोसायटीत बुधवारी दोन मजल्यांवरील स्लॅब कोसळण्याची घटना घडल्यामुळे तेथील 16 कुटुंबीयांना घरे रिकामी करावी लागली आहेत. महापालिकेने शहरात संक्रमण शिबीर बांधले नसल्यामुळे या कुटुंबांवर नातेवाईकांकडे राहण्याची नामुष्की ओढावली ाहे. 

21 व्या शतकातील सुनियोजित शहर म्हणून ख्याती असलेल्या नवी मुंबईत महापालिका आणि सिडको यांच्यातील असमन्वयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. आपत्कालीन परिस्थितीतील घ्यावयाच्या खबरदारीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा फटका स्वप्न साकार सोसायटीतील रहिवाशांना बसला आहे. बुधवारी घडलेल्या दुर्घटनेमुळे दोन मजल्यावरील दोन कुटंबियांसमवेत इतर सोळा कुटंबियांना महापालिकेने या इमारतीमध्ये राहण्यास मनाई केली आहे. दुर्घटनेनंतर पालिकेने सदरच्या इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत. यात इमारत राहण्याजोगी आहे की नाही हे सद्यस्थिती तपासून करण्यात येणार आहे. हा अहवाल आल्यावर महापालिका निर्णय घेणार आहे. मात्र तोपर्यंत रहीवाशांना त्यांची सोय त्यांनाच करण्याच्या सूचना पालिकेने संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे सोसायटीतील 16 कुटूंबे नातेवाईकांकडे राहत आहे. दुर्घटना घडली तेव्हा महापालिकेने त्यांची बेलापूर येथील रात्र निवारा केंद्रात तात्पुरती व्यवस्था केली होती. मात्र नंतर पुढे काही दिवस राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था करायला पालिकेने सांगितले आहे. निवारा केंद्रात अनेक गैरसोई असल्याने या रहिवाशांनीही नातेवाइकांकडे राहणे पसंत केले आहे. परंतु हा अहवाल यायला वेळ लागला तर रहायचे कुठे, असा प्रश्‍न या कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे. 

स्वप्न साकार सोसायटीमधील नागरिकांची बुधवारी पालिकेच्या बेलापूर येथील रात्र निवारा केंद्रात सोय केली होती. त्यानंतर त्यांनी आपली राहण्याची सोय नातेवाइकांकडे केली आहे. या इमारतीच्या संरचनात्मक परीक्षणाचा अहवाल मागविला आहे. या अहवालानुसार या इमारतीमध्ये राहण्यास परवानगी द्यायची किंवा नाही हे ठरविण्यात येईल. 
- शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापूर 

सत्ताधारी यातून बोध घेतील? 
शहरात संक्रमण शिबीर बांधण्यासाठी प्रशासनाने आणलेला प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी फेटाळला. त्यामुळे संक्रमण शिबिर बांधण्याचे काम लांबणीवर पडले आहे. मात्र नेरूळमधील दुर्घटनेच्याधर्तीवर एखादी मोठी घटना घडल्यास रहिवाशांना पर्यायी जागा कुठे देणार असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. यातून तरी सत्ताधारी बोध घेऊन संक्रमण शिबिराचा प्रश्‍न मार्गी लावतील का, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

Web Title: Structural Audit Report issue Swapna Sakar Society in Nerul