उल्हासनगरातील 14 हजार इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट होणार

दिनेश गोगी
सोमवार, 16 जुलै 2018

अलीकडे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडू लागल्या असून काल सायंकाळी घडलेल्या घटनेत एक महिला ठार झाली आहे.ते पाहता उल्हासनगरात असणाऱ्या 14 हजाराच्या वर असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार पालिकेच्या वतीने सोसायट्यांना पत्र पाठवण्याची प्रक्रिया हाताळली जाणार आहे.आयुक्त गणेश पाटील यांनी ही माहिती दिली.
 

उल्हासनगर- अलीकडे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडू लागल्या असून काल सायंकाळी घडलेल्या घटनेत एक महिला ठार झाली आहे.ते पाहता उल्हासनगरात असणाऱ्या 14 हजाराच्या वर असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार पालिकेच्या वतीने सोसायट्यांना पत्र पाठवण्याची प्रक्रिया हाताळली जाणार आहे.आयुक्त गणेश पाटील यांनी ही माहिती दिली.

काही महिन्यांपूर्वी उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या लक्ष्मीनारायण या इमारतीचा स्लॅब तळमजल्यावर असलेल्या क्लासवर कोसळल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले होते. अतिधोकादायक ठरलेल्या या इमारतीला पाडण्याचे काम सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

आठवड्यापूर्वी खेमानी परिसरातील शांती पॅलेस या इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला. ती खाली करण्यात आली आहे. श्रीराम चौकातील श्रेया कॉम्प्लेक्स या चार मजल्याच्या कमर्शियल इमारतीच्या पिलरला तडे गेल्याने ती देखील खाली करण्यात आली आहे. मात्र धोकादायक इमारतीच्या यादीत नसलेली भाटिया चौकाजवळील मुरलीवाला कॉम्प्लेक्स या इमारतीचा तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला. त्यात लिना गंगवानी ही महिला जागीच ठार झाल्याची दुःखद घटना घडली आहे. त्यामुळे कोणती इमारत सुरक्षित, राहण्याजोगी हा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून त्याअनुषंगाने प्रत्येक इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करणे ही काळाची गरज आहे. तसे पत्र सोसायट्यांना पाठवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. नोंदणीकृत वास्तुविशारदकडून स्ट्रक्चर ऑडिट करून तसा अहवाल पालिकेकडे सादर करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचे गणेश पाटील यांनी सांगितले. उल्हासनगरात 250 च्या आसपास धोकादायक व 20 च्या घरात धोकादायक इमारती आहेत. अतिधोकादायकवर विशेष लक्ष देण्यात येणार असून त्याचा अहवाल पडताळला जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज नागपूर अधिवेशनात आमदार ज्योती कलानी यांनी इमारतींचे स्लॅब कोसळत आहेत.इमारती खाली करण्यात येत असून रहिवाशांचे पुनर्वसन करावे.आणि उल्हासनगरातील बांधकामांसाठी चारचे एफएसआय मंजूर करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Structure audit of 14 thousand buildings in Ulhasanganagar