पुरात उद्‌ध्वस्त संसार सावरण्याची धडपड

आयरे गावात पूरस्थितीनंतर चाळीत पसरलेला शुकशुकाट.
आयरे गावात पूरस्थितीनंतर चाळीत पसरलेला शुकशुकाट.

ठाणे : ‘कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा’, या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी नकळत पूरग्रस्त रहिवाशांची जगण्याशी सुरू असलेली धडपड पाहून ओठांवर येतात. पुराचे पाणी घरात शिरले आणि त्यांचे संसारच उघड्यावर आले. पाणी ओसरल्यानंतर पुन्हा संसार उभे करण्यासाठी त्यांची धडपड चालली होती. डोंबिवलीतील कोपर स्थानकानजीकच्या आयरे गावातील ही स्थिती...

शनिवारी रात्री पावसाचे पाणी घराची एक एक पायरी चढत होते. पावसाचे पाणी घराच्या तळाशी आल्याने काहींनी त्याच दिवशी बायका-पोरांना घेऊन घर सोडण्याचा निर्णय घेतला. पोलिस, पालिका अधिकाऱ्यांनीही नागरिकांना घर खाली करण्याचा इशारा देत त्यांची सोय नजीकच्या शास्त्री शाळेत, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत केली. काही नागरिक मात्र घरात जास्त पाणी येणार नाही याच आशेवर होते. यात रात्र कशीबशी काढली; मात्र रविवारची सकाळ उजाडली तोच पावसाच्या पाण्याने घराचा ताबा घेतला. 

यात सारे उद्‌ध्वस्त झाले. सोमवारी दुपारनंतर पावसाचे पाणी ओसरल्यावर नागरिकांनी पुन्हा आपल्या घराकडे कुच केली. परंतु घराची अवस्था पाहून सर्वच जण स्तब्ध झाले. आयरे गावात चाळींची संख्या मोठ्या प्रमाणात असून, सुमारे दोन ते तीन हजार घरे आहेत. यातील अडीच हजार घरे तरी पाण्याखाली गेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घरांचे किती नुकसान झाले आहे, याचा पंचनामा सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू आहे.

रोगराईची शक्‍यता
नाल्यातील सर्व कचरा परिसरात रस्त्यावर व इतरत्र पसरला आहे. उंदीर, घुशी रस्त्यावर मृतावस्थेत पडलेले आहेत. घरातील पूर्णतः खराब झालेले सामान  नाल्याकाठीच नागरिकांनी टाकून देण्यास सुरुवात केली आहे. परिसरात पालिका प्रशासनाने औषध फवारणी केलेली नाही. घरातील घाण काढल्याने नागरिकांचे हात पाय दुखणे, खोकला, ताप यांसारखे आजार जडू लागले आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता गणेश कदम यांनी वर्तवली आहे. 

घरातील कपडे, चादरी तर भिजल्याच आहेत, पण धान्यही भिजले आहे. तीन महिन्यांचे बाळ आहे. घरातील साफसफाई आता करत आहोत. दुकानातील धान्याचेही नुकसान झाल्याने लांबून जाऊन धान्य घेऊन यावे लागले. 
-प्रशांत करबेले, आई गावदेवी दर्शन चाळ

घरात एक वेगळाच वास मारतो. भिजलेले सामान सुकवण्याची धडपड सुरू आहे. दोन दिवसांनी पाणी आल्याने आज साफसफाई करण्यास घेतली. सुहास खैर हेही पावसाचे पाणी उपसण्याचे काम करीत होते. 
- रेखा घोलाई, सावली निकेतन चाळ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com