सुवर्णमहोत्सवाच्या तयारीत विद्यार्थी रममाण

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

शरद पवार यांची उपस्थिती; दोन दिवस रंगणार कार्यक्रम 

उलवा : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव १३ ते २० मार्चदरम्यान होणार आहे. त्यामुळे आजी-माजी विद्यार्थी महोत्सवाच्या तयारीत रममाण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या महाविद्यालयाने अनेक नामवंत विद्यार्थी घडविले आहेत. तळागाळातील विद्यार्थी या महाविद्यालयामुळे शिकले, याची जाण सर्वांनाच आहे. त्यामुळे सुवर्णमहोत्सवाचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असाच असेल, असे माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले. सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते.

हे पण वाचा ः रंगला असा पालखी सोहळा 

या वेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, दिबांचे पुत्र अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांकडून स्वखूशीने निधी उभारून त्यातूनच सुवर्णमहोत्सव साजरा केला जाईल, असे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी सांगितले. पनवेलमधील सर्वात जुने महाविद्यालय म्हणून पनवेलमधील एएससी कॉलेज ओळखले जाते. आता ते महात्मा फुले कला, विज्ञान व वाणीज्य महाविद्यालय म्हणून सर्वांना परिचित आहे.

हे पण वाचा ः कोणी सावली देईल का?

या महाविद्यालयाची स्थापना १९७० मध्ये लोकनेते दि. बा. पाटील आणि त्यांच्या शिलेदारांनी केली. २०१७ मध्ये या महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनात ‘ए’ ग्रेड मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे १६३ गावांतील विद्यार्थी शिकले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचा कर्मचारी वर्ग पायाला भिंगरी लावल्यागत कामाला लागला असून गावोगावी माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध समित्या स्थापन केल्या असून त्यांच्यावर जबाबदाऱ्या देऊन त्यांच्याकडून आढावा घेण्याचे काम प्राचार्य गणेश ठाकूर करीत आहेत. 

पन्नास वर्षांपूर्वीच्या इमारतीचे आता वय झाले आहे; परंतु कॉलेज तरुण आहे. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अत्याधुनिक सुविधांनी स्मार्ट इमारत बांधण्याचा सुमारे २० कोटींच्या प्रकल्पाचा आराखडा तयार आहे. लवकरच तो दृष्टिपथात येईल.
- बाळाराम पाटील, आमदार. 

सुवर्णमहोत्सवात आजी-माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्याला ज्या महाविद्यालयाने घडविले, त्या महाविद्यालयासाठी माजी विद्यार्थांनी आत्मियतेने आपले योगदान द्यावे आणि आपला खारीचा वाटा उचलावा.
- महेंद्र घरत, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student busy in preparation for the Golden jubilee Festival