नेरळमध्‍ये विद्यार्थ्याच्या हाताचे बोट तुटले

विराज
विराज

नेरळ (बातमीदार) : नेरळ पेट्रोल पंप येथील हाजी लियाकत इंग्लिश मीडियम शाळेत सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे बोट तुटले. विद्यार्थ्यांच्या बोटाबद्दल शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना कोणतीही माहिती देण्यात आली नसून पालकांनी खासगी डॉक्‍टरकडे विद्यार्थ्यांला नेल्यावर ही बाब समोर आली.

हाजी लियाकत इंग्लिश मीडियम शाळेत ६ डिसेंबरला क्रीडा कार्यक्रम होते. दुपारी बाराच्या सुमारास विराज ठक्‍कर वर्गखोलीच्या दरवाज्यात हात ठेऊन उभा असताना अचानक दरवाजा लागला. यात विराजच्या डाव्या हाताच्या करंगळीचा तुकडा पडला. वर्गखोलीच्या दरवाजाला रोधक (स्टॉपर) नसल्याने ही घटना घडली. या घटनेनंतर विराजला शाळेतील शिक्षकांनी तत्काळ नेरळ गावातील डॉ. महेश शिरसाट यांच्या दवाखान्यात नेले; मात्र डॉ. शिरसाट यांच्याकडून प्रथमोपचार करून विराजला परत शाळेत नेण्यात आले. त्यानंतर विराजला घेऊन शिक्षक त्याच्या घरी गेले. फक्त नख तुटले आहे, असे विराजची आई दिव्या यांना सांगितले; परंतु संध्याकाळपर्यंत विराजच्या करंगळीची पट्टी रक्ताने भरली. त्यामुळे दिव्या ठक्कर यांनी विराजला दवाखान्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

नेरळ साई मंदिर परिसरातील डॉ. राठोड यांचे ओजस क्‍लिनिक येथे त्या गेल्या. डॉ. राठोड यांनी विराजची पट्टी उघडली. या वेळी दिव्या ठक्कर यांना धक्काच बसला. विराजच्या करंगळीचा वरच्या भागाचा तुकडा पडला होता. डॉ. राठोड यांनीदेखील विराजची जखम पाहून तत्काळ पुढे हलवण्याचा सल्ला दिला. विराजच्या वडिलांना बोलावून घेऊन ठक्कर दाम्पत्याने ठाणे येथील नोबेल हॉस्पिटल गाठले. तेथे विराजवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. विराजच्या तुटलेल्या करंगळीचा भाग मिळाला असता, तर तो पुन्हा जोडला गेला असता; मात्र शाळा प्रशासनाने तोही न दिल्याने तसेच तो भाग कुठे गेला, हेदेखील माहीत नाही, असे उत्तर ठक्कर कुटुंबीयांना शाळा प्रशासनाने दिले आहे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देतो; मात्र विराजचा अपघात घडला. या वेळी तेथील वर्गखोलीच्या दरवाजाचा रोधक (स्टॉपर) खालील फरशी निखळली होती. त्यामुळे दरवाजा जोरात लागला गेला असेल. त्याचे नख निघाले असेल म्हणून प्रथमोपचार करून त्याला घरी सोडले. त्यात आमची काही चूक नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली, त्याला आपण काय करू शकतो.
- मिलिंद गायकवाड, मुख्याध्यापक, हाजी लियाकत स्कूल

हाजी लियाकत शाळेतील शिक्षक विराजला घेऊन आले होते. त्याच्या करंगळीच्या बोटावरचा एक भाग तुटला होता. त्यामुळे प्रथमोपचार करून तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घ्या, असे प्रिस्क्रिप्शनवर लिहूनदेखील दिले होते.
- डॉ. महेश शिरसाट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com