विद्यार्थ्यांवर पावसाळी पाण्याचे नियोजन करण्याचे आधुनिक संस्कार

सुचिता करमरकर
मंगळवार, 15 मे 2018

कल्याण : जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पावसाळी पाण्याचे नियोजन करण्याचे आधुनिक संस्कार कल्याणमधील एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. आपला शतक महोत्सव साजरा करणाऱ्या मध्य रेल्वेच्या कल्याणातील शाळेने हा उपक्रम राबवला आहे. 

कल्याण : जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पावसाळी पाण्याचे नियोजन करण्याचे आधुनिक संस्कार कल्याणमधील एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. आपला शतक महोत्सव साजरा करणाऱ्या मध्य रेल्वेच्या कल्याणातील शाळेने हा उपक्रम राबवला आहे. 

पाण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. पाण्यासाठी गावागावात चळवळ उभी केली जात आहे. या सर्व गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेची ही शाळा पावसाळी पाण्याचे नियोजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा अनेक प्रयत्न करत असतात. मात्र काळाची गरज ओळखून आपल्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणारी ही कदाचित पहिलीच शाळा असावी. 

मुरबाड रोड वर तीन एकरच्या प्रशस्त जागेत ही शाळा वसली आहे. शाळेला असलेल्या विस्तीर्ण मैदानाचे आकर्षण सर्वांना आहे. परिसरात मागील अनेक वर्षांपासून विविध झाडांची जोपासना केली आहे. शाळेची वास्तू अनेक वर्षांपूर्वी बांधलेली आहे. त्यामुळे याठिकाणी त्या काळानुसार पावसाळी पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा होती. गेली अनेक वर्षे येथील झाडांना याच पाण्याचा आधार मिळत होता. यात काही सुधारणा करण्यात आल्या होत्या, मात्र याच कामाला आता शास्त्र शुध्द तंत्राची जोड देण्यात आली. रोटरी क्लबच्या माध्यमातून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. यामुळे आता पावसाचे पाणी शुध्द करुन भूगर्भात सोडले जाणार आहे. या उपक्रमाचा फायदा परिसरातील नागरिकांनाही होणार आहे. मध्य रेल्वेच्या या शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. रेल्वे प्रशासनाकडूनही येथे अनेक उपक्रम राबवले जातात. या शाळेतील अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत असतात. आता या विद्यार्थ्यांना काळानुरुप आवश्यक असलेल्या गोष्टी शिकवल्या जात आहेत.

पावसाळी पाण्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाधिक गृहसंकुलांनी पुढाकार घ्यावा यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रयत्न करत आहे. 2007 पासून पालिका क्षेत्रातील नविन बांधकामांना पावसाळी पाण्याचे नियोजन करणारी यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यात पालिकेला अपयश आले आहे. पालिका क्षेत्रात होत असलेली बांधकामे आणि ही यंत्रणा उभारण्याऱ्या गृहसंकुलांच्या आकडेवारीत प्रचंड तफावत आहे. अशा प्रकारची कामे नगरसेवकांच्या विकास निधीतून करण्याबाबतही महासभेने ठराव केला आहे. परंतु त्याचा फायदा नेमका कितीजणांना झाला हा संशोधनाचा विषय आहे.

Web Title: students learns rain water harvesting in school in kalyan