दहावी परीक्षा अर्जांकडे विद्यार्थ्यांची पाठ! मुख्याध्यापक संभ्रमात; शिक्षण मंडळाची प्रक्रियेस मुदतवाढ 

तेजस वाघमारे
Monday, 11 January 2021

 मुंबई विभागातील सुमारे निम्म्या विद्यार्थ्यांनी अद्यापही मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा अर्जच भरलेला नाही. बहुतांश विद्यार्थांनी अर्ज भरले नसल्याने अखेर शिक्षण मंडळाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे

मुंबई,  : मुंबई विभागातील सुमारे निम्म्या विद्यार्थ्यांनी अद्यापही मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा अर्जच भरलेला नाही. बहुतांश विद्यार्थांनी अर्ज भरले नसल्याने अखेर शिक्षण मंडळाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे; मात्र मुंबईतील शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्याने कुटुंबासोबत मूळ गावी असलेले विद्यार्थी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठीही शाळेत येत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कसे भरायचे, असा प्रश्‍न मुख्याध्यापकांना पडला आहे. 

 

मुंबई विभागीय शिक्षण मंडळातून 11 जानेवारीपर्यंत 2 लाख 39 हजार 690 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी 3 लाख 32 हजार 746 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे अद्याप एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्याध्यापक संघटनाही सुमारे 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले नसल्याचे सांगत आहेत. अनेक पालक संपर्क साधून अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करत असल्याने मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत. मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या अध्यक्षा दिलशाद थोबानी आणि सचिव प्रशांत रेडीज यांनी याप्रश्‍नी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार परीक्षा अर्ज भरण्यास मंडळाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार अर्ज भरण्याची मुदत 25 जानेवारीपर्यंत आहे. नियमित विद्यार्थी www.mahasscboard.in या संकेतस्थळावरून परीक्षा अर्ज भरू शकतात. खासगी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले आणि श्रेणी सुधार योजनेतील विद्यार्थीही याच कालावधीत अर्ज भरू शकतात, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यसाठी येत क्लिक करा

50 टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षा घ्या! 
जानेवारी महिना सुरू झाला तरी मुंबई परिसरात दहावी-बारावीचे वर्ग सुरू झालेले नाहीत. अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केली असली तरी ती पुरेशी नाही. उर्वरित 75 टक्के अभ्यासक्रम शिकविण्यासाठी अपुरा वेळ आहे. त्यातच ऑनलाईन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना नीट आकलन होताना दिसत नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी केवळ 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्याची मागणीही मुख्याध्यापक संघटनेने केली आहे. 

Students lesson on 10th exam application The headmaster is confused Board of Education process extension

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students lesson on 10th exam application The headmaster is confused Board of Education process extension