ठाण्यात मैदान बचावासाठी विद्यार्थी रस्त्यावर 

ठाणे : मैदानासाठी विद्याथ्यार्ंनी पालिकेवर काढलेला मोर्चा. (छायाचित्र - दीपक कुरकुंडे)
ठाणे : मैदानासाठी विद्याथ्यार्ंनी पालिकेवर काढलेला मोर्चा. (छायाचित्र - दीपक कुरकुंडे)

ठाणे : "स्मार्ट सिटी'च्या ठाणे शहरात शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच शिल्लक राहिले नसून "आम्हाला आमच्या हक्काचे मैदान पुन्हा परत करा; अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू' असा इशारा देत हाजुरी येथील महापालिकेच्या शाळा क्र. 126, 32 शाळेतील विद्यार्थ्यांनी आज ठाणे महापालिकेवर मोर्चा काढला. शाळेच्या मैदानाच्या जागेवर डाटा सेंटर उभारण्याचे काम सुरू असून यामुळे मैदान नाहीसे होणार आहे. या बांधकामामुळे शाळेच्या समोर उपलब्ध असलेले मैदान पूर्णपणे बाधित होत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी या वेळी सांगितले.
 
हाजुरी येथे महापालिकेची ऊर्दू शाळा आहे. या शाळेत आजूबाजूच्या परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी पहिले ते आठवीपर्यंतचे सकाळी आणि दुपारच्या सत्रात वर्ग भरतात. याच शाळेच्या मैदानावर प्रशासनाच्या वतीने डाटा सेंटरची इमारत बांधण्यात येत असून त्या पद्धतीने काम सुरू आहे. तेथे गेली अनेक वर्षे अस्तित्वात असलेल्या शाळेचे मैदान पूर्णपणे बाधित होणार असल्याचे या वेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले. त्या ठिकाणी शाळेच्या मैदानावर स्वातंत्रय दिन, प्रजासत्ताक दिन, शारीरिक शिक्षणाचे कार्यक्रम, कवायती यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात; मात्र भविष्यात मैदानच शिल्लक राहणार नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. 

शालेय विद्यार्थ्यांना ज्याप्रकारे शालेय अभ्यास महत्त्वाचा असतो, तितकाच त्यांना शालेय शिक्षण, मैदानी खेळ महत्त्वाचे असतात. सदर बांधकामामुळे शाळेच्या समोर उपलब्ध असलेले मैदान पूर्णपणे बाधित होत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. या प्रकरणात गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांचे पालक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने पाठपुरावा, उचित प्रकारे पत्रव्यवहार केला जात असूनही प्रशासनाच्या वतीने कोणत्याच प्रकारचे सहकार्य आणि न्याय दिला जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, आताही न्याय मिळाला नाही तर आम्ही पालिका प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करू आणि यास पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या वेळी विद्यार्थ्यांनी दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com