रात्रीची मुंबई स्टंटबाजांचीच... 

Bike Stunt
Bike Stunt

मुंबई : पोलिसांनी रात्री कितीही नाकाबंदी केली तरी मोटरसायकलस्वारांचे स्टंटबाजीचे प्रकार मुंबईत काही थांबत नाहीत. सागरी सेतू परिसर, मरिन ड्राइव्ह येथे सुसाट वेगाने जाणाऱ्या स्टंटबाजांसोबत आता जॉयरायडर्सचीही भर पडली आहे. त्यामुळे रात्रीची मुंबई ही त्यांचीच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. 

पश्‍चिम आणि पूर्व उपनगरांना दक्षिण मुंबईशी जोडणारा वांद्रे-वरळी सागरी सेतू परिसर स्टंटबाजांचा अड्डा आहे. आठ दिवसांपूर्वी सेतू परिसरात विचित्र अपघात झाला होता. त्यानंतरही स्टंटबाजांनी अजिबात धडा घेतलेला नाही. शनिवारची रात्र आणि नाताळ जोडून आल्यामुळे सेतू, मरिन ड्राइव्ह, वांद्रे-कुर्ला संकुल येथे स्टंटबाज दिसत होते; तर विनाहेल्मेट सुसाट वेगाने जाणारे स्टंटबाज पोलिसांना वाकुल्या करून जात असल्याचे चित्र सेतूवरील रिक्‍लमेशन परिसरात होते. 

सेतूजवळ थरार 
सेतू परिसरात होणारी स्टंटबाजी रोखण्याकरता पोलिसांनी खेरवाडी, वांद्रे-कुर्ला संकुल जंक्‍शन, वांद्रे परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. तरीही सेतू परिसरात स्टंटबाजांचा 'खतरों का खेल' सुरूच होता. सेतूजवळील टोल प्लाझाकडून वळण घेऊन स्टंटबाज सुसाट वेगाने पुन्हा वांद्य्राच्या दिशेला जात होते. पोलिस तैनात आहेत का याची खात्री करण्यासाठी अधूनमधून एकदोन स्टंटबाज येऊन पाहणी करायचे. 1.30 वाजण्याच्या सुमारास चार स्टंटबाज सेतूवर आले. सेतूजवळ थरारक स्टंट करून ते रिक्‍लमेशनच्या दिशेने पळून गेले. 

गस्तीमुळे भीती 
नाताळ आणि शनिवार एकत्र आल्यामुळे अपघाताच्या घटना होऊ नयेत याकरता सागरी सेतू परिसरात वरिष्ठ अधिकारी गस्त घालत होते. 1.45 च्या सुमारास 10 जणांचे टोळके सेतूजवळ सेलिब्रेशनमध्ये होते. तेव्हाच परिमंडळ 9 चे उपायुक्त सत्यनारायण यांनी त्या टोळक्‍याला सज्जड दम दिला. पोलिसांच्या भीतीने ते टोळके तेथून गेले. वांद्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंडित ठाकरे हेदेखील यू-टर्न उड्डाणपूल आणि रिक्‍लमेशन येथे गस्त घालत होते. 

जॉयरायडर्सची डोकेदुखी 
मौजमजेकरता सागरी सेतू परिसर आणि मरिन ड्राइव्हवर येणारे जॉयरायडर्स ही पोलिसांसमोरची डोकेदुखी आहे. स्कुटी किंवा तत्सम वाहने घेऊन येणारे चालक हे जॉयरायडर्स म्हणून ओळखले जातात. ते ट्रिपलसीट येतात. सुसाट वेगातील या रायडर्सना जराही अपघाताची भीती नसते. सेतूवर 'धूम स्टाईल' रेसिंग केल्यावर ते कलानगर जंक्‍शनकडे येतात. कलानगर जंक्‍शनला काही वेळ थांबतात; तर वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये पोलिसांची नाकाबंदी असल्यामुळे जॉयरायडर्स मातोश्रीच्या दिशेकडील गल्लीबोळातून पळ काढून उपनगरात जात होते; तर वरळीहून पेडर रोडमार्गे मरिन ड्राइव्हवर जाणाऱ्या स्टंटबाजांना रोखण्याकरिता 3 वाजता गावदेवी पोलिसांनी महालक्ष्मीच्या कॅडबरी जंक्‍शन येथे नाकाबंदी केली. त्यानंतर ते विरुद्ध दिशेने मोटरसायकलवर सुसाट वेगाने पळत होते. 

चहावाल्यांचा आधार 
मध्यरात्रीच्या वेळेस मरिन ड्राइव्ह परिसरात येणारे स्टंटबाज हे गिरगाव चौपाटी, चर्नी रोड येथील सायकल चहावाल्यांकडे थांबतात. चहावाल्यांकडे थांबल्यावर एक जण पुढे जाऊन नाकाबंदी आहे का हे पाहतो. नाकाबंदी नसल्यास मोबाईलवर एकमेकांना संपर्क करतात. नाकाबंदी असली तर ते चहावाल्याजवळ थांबतात. नाकाबंदी शिथिल असेल तर स्टंटबाज पुन्हा 'धूम स्टाईलने' निघतात. 

हेल्मेट फक्त नावाला 
स्टंटबाज आणि जॉयरायडर्स हे रात्रीच्या वेळेस विनाहेल्मेटच मोटरसायकली चालवतात. नाकाबंदीमध्ये पोलिस हेल्मेट घातलेल्या मोटरसायकलस्वारांना अडवत नाहीत, हे जॉयरायडर्सना माहीत असते. त्यामुळे नावाकरता ते हेल्मेट सोबत ठेवतात. नाकाबंदीपासून दूर गेल्यानंतर ते हेल्मेट मागे बसणाऱ्याकडे देतात. 

यू टर्न उड्डाणपुलावर दिवे बंद 
सागरी सेतू येथील यू टर्न उड्डाणपुलावर अपघाताच्या घटना वारंवार घडल्या आहेत. तेथील दिवे अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे मोटरसायकलस्वारांना अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी त्या ठिकाणी जीवघेणे सात आणि चार किरकोळ अपघात घडले होते. बंद दिव्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अद्याप काहीही केले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com