खालापुरात उपजिल्हा रुग्णालय उभारणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

खालापूर हद्दीतून द्रुतगती, राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गांवर अपघात घडल्यानंतर सोईसुविधा, डॉक्‍टरांच्या कमतरतेमुळे जखमींना मुंबई, पुणे, नवी मुंबई, पनवेल आदी ठिकाणी उपचारासाठी पाठवले जायचे.

खालापूर (बातमीदार) : खालापूर हद्दीतून द्रुतगती, राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गांवर अपघात घडल्यानंतर सोईसुविधा, डॉक्‍टरांच्या कमतरतेमुळे जखमींना मुंबई, पुणे, नवी मुंबई, पनवेल आदी ठिकाणी उपचारासाठी पाठवले जायचे. प्रसंगी उपचाराअभावी त्यांचा मृत्यूही ओढवल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून उपजिल्हा रुग्णालयाची मागणी केली जात होती. मात्र, आता जखमींची होणारी ही फरपट लवकरच थांबणार आहे. खालापुरात लवकरच उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. त्यासाठी महसूल विभागाने आवश्‍यक जमिनीची पूर्तता केली आहे, अशी माहिती तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी दिली. 

मुंबई-पुणे महानगराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खालापूर तालुक्‍यातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, तसेच खोपोली-पेण, खोपोली-पाली, सावरोली-खारपाडा, चौक-कर्जत, खालापूर-पळसदरी मार्गे कर्जत असे महत्त्वाचे राज्य मार्ग जातात. सर्वाधिक अपघाताचे प्रमाण द्रुतगती आणि राष्ट्रीय महामार्गावर होतात. येथे दिवसाला सरासरी तीन अपघात होत असून, महिन्याला हे अपघात शंभरी ओलांडतात. यामध्ये रस्ते अपघाताची सर्वांत चिंताजनक आकडेवारी आहे. त्यात वेळेत उपचाराअभावी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अपघातानंतर तातडीच्या उपचारासाठी सर्व सोई-सुविधांनी सुसज्ज रुग्णालय खालापूर तालुक्‍यात नसल्याने रुग्णांना पनवेल, नवी मुंबई किंवा पुण्याला हलवण्याची गरज भासते. 

तालुक्‍यातील शासकीय आरोग्य सेवा प्रथमोपचारापुरती मर्यादित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सर्वच ठिकाणी डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. आरोग्य केंद्रात स्वच्छता आणि सुविधांचा अभाव, तसेच अत्यावश्‍यक औषधांचा तुटवडा, अत्याधुनिक यंत्रसामग्रीची कमतरता आहे. त्यामुळे गंभीर जखमी रुग्णाला वाचवण्यासाठी येथील डॉक्‍टरही रुग्णांना तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देतात. 

खालापुरात मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज रुग्णालयाची मागणी अनेक वर्षे होत आहे. सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ यांनी नागरिकांची सह्याची मोहीम राबवून खासदार, आमदार, तसेच आरोग्यमंत्री यांनाही वेळोवेळी निवेदन दिलीत. अखेर माजी आमदार सुरेश लाड आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील यांच्या प्रयत्नाने उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले. त्यासाठी आवश्‍यक अडीच एकर जागेचा प्रश्न होता. देवन्हावेचे ग्रामपंचायतीचे सरपंच अंकित साखरे यांनी ग्रामपंचायत हद्दीत जागा देण्याची तयारी दाखवली. इसांबे फाटा येथे अडीच एकर जागेची उपलब्धता झाल्यावर त्यातील तांत्रिक सोपस्कर, अडचणी महसूल विभागाने दूर करत जागेचे हस्तांतरण केल्याची माहिती तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी दिली. खालापुरात मध्यवर्ती ठिकाणी उपजिल्हा रूग्णालय उभे राहणार असल्याने अपघातानंतर खालापुरातील कोणत्याही ठिकाणाहून काही मिनिटात पोहचणे शक्‍य होणार आहे.
याशिवाय खालापूर तालुक्‍याचा वाढता पसारा, ३००च्यावर कारखाने यावरून खालापूर तालुक्‍याचा अंदाज येतो. 

खालापूर तहसीलकडून उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्‍यक जागा संबंधित विभागाला देण्याची प्रक्रिया पार पडली आहे. स्थानिक सहकार्यही मिळाले.
- इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर

खालापुरात सुसज्ज रुग्णालयाची आवश्‍यकता होती. जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. याशिवाय खिरकिंडी येथेही आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आहे.
- नरेश पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती, रायगड जिल्हा परिषद

गंभीर जखमींना तातडीने मदत मिळण्यास मदत होणार असून, अनेकांचे प्राण वाचणार आहेत. खालापूरसाठी कार्डीअर रुग्णवाहिकेचीही मागणी आम्ही केली असून, माजी आमदार सुरेश लाड यांनी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
- गुरुनाथ साठेलकर, अपघातग्रस्त मदत पथकप्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sub-District Hospital in Khalapur