अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - आमदार नरेंद्र पवार

सुचिता करमरकर
रविवार, 8 जुलै 2018

संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांनी आज केली आहे.

कल्याण - येथील शिवाजी चौकात झालेल्या अपघातात एका महिन्यात दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांनी आज केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पालिका अधिकाऱ्यांसह पवार यांनी आज या रस्त्याची पाहणी केली. या पाहणीनंतर महामंडळाने याठिकाणी त्वरित दुरुस्तीच्या कामास सुरवात केली आहे. 
       
शनिवारी (7 जुलै) या रस्त्यावर मनिषा भोईर यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. पावसामुळे साठलेल्या पाण्यातून दुचाकीवरुन जाताना उंचसखल रस्त्यामुळे तोल जाऊन पडल्याने मागून येणाऱ्या वाहनांच्या चाकाखाली येत मनिषा यांचा मृत्यू झाला होता. याच ठिकाणी मागील महिन्यात आरोह या आठ वर्षीय मुलाचाही असाच मृत्यू झाला आहे. कल्याण शहरातील हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती रस्ते विकास महामंडळामार्फत केली जाते. याठिकाणी लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक्स काही ठिकाणी खचले आहेत. त्यामुळे रस्ता उंचसखल झाला आहे. पावसाचे पाणी साचल्यानंतर या परिसरातून जाताना दुचाकी वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यातूनच असे अपघात घडण्याची भीती असते. 
         
पहिल्या पावसानंतर झालेल्या अपघातानंतर या ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेला दिले होते. मात्र त्यावर केवळ कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. दोन जणांना जीव गमवावे लागल्यानंतर आज या रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांनी ही पाहणी केली. - नरेंद्र पवार, आमदार, कल्याण पश्चिम
     

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Submit a criminal case against officers demanded MLA Narendra Pawar