यकृतदानामुळे नवजात शिशुला जीवनदान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

फोर्टिस रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण 
 

मुंबई ः वैद्यकीय क्षेत्रात अतिशय आव्हानात्मक असलेली नवजात शिशुची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली. त्यामुळे नवजात बाळाला जीवनदान मिळाले आहे. छत्तीसगढ येथील कुंडू कुटुंबातील पियुष या चिमुरड्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे त्याच्या आजीनेच त्याला यकृतदान दिले. आम्ही सर्व आशा सोडून दिली होती; मात्र यशस्वी यकृत प्रत्यारोपणामुळे मुलगा घरी परतत आहे. पुढे तो आणखी स्वस्थ बनेल, अशी भावना पियुषच्या आईने व्यक्त केली. तर, ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टरांचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया रुग्णालयाच्या विभागीय संचालिका डॉ. एस नारायणी यांनी दिली आहे. 

रायपूरचे रहिवासी असणाऱ्या कुंडू कुटुंबाला कोलकातामधील एका खासगी रुग्णालयामध्ये पुत्ररत्नाचा लाभ झाला. पण जन्मानंतर लगेचच मुलाला काविळ झाल्याचे निष्पन्न झाले. अनेक वैद्यकीय चाचण्यांनंतर डॉक्‍टरांनी मुलाला वाचविण्यासाठी यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगितले. अवघ्या साडेपाच किलो वजन असलेल्या बाळाला कुटुंबीयांनी आंध्र प्रदेश व बेंगळूरुमधील विविध रुग्णालयांध्ये नेत उपचार केले; मात्र फरक पडला नाही. यकृत प्रत्यारोपणासाठी खूप खर्च होणार असल्यामुळे मुलाचा जीव वाचविण्यासाठी अखेर रायपूरमधील एका नामांकित रुग्णालयात त्यांनी मुलाला दाखल केले. तेथे मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयाचे यकृत प्रत्यारोपण व एचपीबी सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. स्वप्नील शर्मा यांच्याशी कुटुंबाची भेट झाली. डॉ. शर्मा यांनी कुटुंबाला धीर दिला. शस्त्रक्रियेसाठी विविध ट्रस्ट व व्यासपीठांच्या माध्यमांतून आर्थिक साह्य होऊ शकते, याबाबत दिलासा दिला. तसेच फोर्टिस रुग्णालयात करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेची प्रक्रियाही स्पष्ट केली. त्यानंतर मुलाच्या आईने शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली.   

त्यानंतर यकृत प्रत्यारोपणासाठी आई, आजी आणि काकी त्वरित मुंबईला रवाना झाले. लहान बाळाला मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात आयसीयूत ठेवण्यात आले. तपासणीनंतर मुलाला तीव्र काविळ झाल्याचे स्पष्ट झाले. तज्ज्ञ डॉक्‍टर जेसल शेठ यांच्या नेतृत्वाखालील चमूने मुलाची काळजी घेतली. पुढील दोन आठवड्यांमध्ये मुलावर अँण्टीबायोटिक्‍स, फिजिओथेरपी आणि पौष्टिक आहारासह उपचार करण्यात आले. त्यानंतर यकृत प्रत्यारोपण व एचपीबी सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. गौरव गुप्ता व डॉ. स्वप्नील शर्मा यांचा समावेश असलेल्या पथकाने पियुषच्या आजीची तपासणी केली. त्यांचे यकृत मुलासाठी योग्य असल्याचे त्यांनी निश्‍चित केले. हे प्रत्यारोपण आव्हानात्मक तसेच अनिश्‍चित होते. शस्त्रक्रियेमध्ये मुलाला काही काळापुरता व्हेंटिलेटरचा आधार देण्यात आला. त्यानंतर प्रमुख भूलतज्ज्ञ डॉ. संगीता शेट्टी आणि डॉ. वैशाली यांनी सर्वोत्तम प्रयत्न करत पियुषला शुद्धिमध्ये आणले. पुढील काही दिवस मुलाची सर्वतोपरी काळजी घेण्याचे आव्हान डॉक्‍टरांसमोर होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद देत पियुषच्या तब्येतीत अल्पावधीतच अनपेक्षितरित्या सुधारणा झाली. 

आमचा लहान रुग्ण घरी परततोय! 
हे यश गाठणाऱ्या माझ्या टीमचा अभिमान आहे. यकृत प्रत्यारोपण करण्यात आलेला आमचा सर्वात लहान रुग्ण घरी परतत आहे, अशी प्रतिक्रिया फोर्टिसच्या विभागीय संचालिका डॉ. एस. नारायणी यांनी व्यक्त केली; तर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे कन्सल्टंट डॉ. गौरव गुुप्ता यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे पियुषच्या आईने कौतुक करत त्यांचे आभार मानले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: successful liver transplant surgery on Newborn baby in mumbai