तीन वर्षीय मुलाच्या घशातून विनाशस्त्रक्रिया नाणे काढण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्‍टरांचे यश

ठाणे : शुक्रवारी ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात कोणतीही शस्त्रक्रिया न करता तीन वर्षांच्या मुलाच्या घशात अडकलेले नाणे काढण्यात यश आले. ठाण्यातील राबोडी येथे राहणारा तीन वर्षीय कृष्णा माने या मुलाने खेळता खेळता एक रुपयाचे नाणे गिळल्याचा प्रकार गुरुवारी घडला.

या प्रकाराने घाबरलेल्या पालकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. या प्रसंगी ठाणे जिल्हा रुग्णालयातून केईएम किंवा जे. जे.सारख्या सोयी-सुविधा असलेल्या रुग्णालयात रुग्णाला पाठवले जाते. मात्र, या लहान मुलाच्या जीवितास धोका असल्याचे कळताच जिल्हा रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. माधवी पंधारे यांनी भुलतज्ज्ञ डॉ. रुपाली यादव यांच्या सहकार्याने त्या मुलाच्या घशातील नाणे काढण्याचा निर्णय घेतला.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी या मुलाने पाणी प्यायल्याने रात्री शस्त्रक्रिया करणे शक्‍य नसल्याचे, डॉ. रुपाली यादव यांनी सांगितले. त्यामुळे तब्बल सात तासांनी संपूर्ण तपासण्या केल्यावर भूल देऊन नळीच्या सहाय्याने अगदी सावधपणे या चिमुकल्याच्या घशातून नाणे काढण्यात डॉ. माधवी आणि डॉ. रुपाली यांना यश आले. 

नाणे हे अन्ननलिका आणि श्‍वसननलिकेच्या मध्यभागी (क्रिकोफारिग्स) अडकल्याने त्या बालकाच्या जिवाला धोका होता. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्या मुलाचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले. 
- डॉ. माधवी पंधारे,
कान-नाक-घसा तज्ज्ञ, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful removal of catastrophic coin from throat of three-year-old boy