पाठीचा मणका तीन ठिकाणी वाकला! 

पाठीचा मणका वाकला
पाठीचा मणका वाकला

मुंबई : पाठीचा मणका पूर्णपणे वेडावाकडा होऊन पोक आलेल्या 14 वर्षांच्या मुलीची चार वर्षांच्या त्रासानंतर अखेर सुटका झाली आहे. त्रासामुळे चालणे-फिरणे बंद झाल्याने मुलीने आत्मविश्‍वासच गमावला होता; परंतु फोर्टमधील जीटी रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्‍टरांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करत तिला पुन्हा उभे केले. तिचा मणका तीन ठिकाणी वाकडा झाला होता. 

विचित्र आजारामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगावात राहणाऱ्या 14 वर्षांच्या मुलीचे प्रचंड हाल होत होते. मुंबईत खासगी रुग्णालयात उपचारांसाठी तिला पाच लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. 15 दिवसांपूर्वीच जे. जे. रुग्णालयाशी संबंधित फोर्टमधील जीटी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तपासण्यांनंतर तिला पाठीच्या कण्याशी संबंधित "स्कॅलिओसीस' आजार झाल्याचे निष्पन्न झाले. मुलीच्या पाठीच्या मणक्‍यात तीन बाक होते. एक बाक तर काटकोनाच्या आकारानेही खाली वाकलेला होता. त्यामुळे तिच्यावर उपचार करणे आव्हानात्मक होते. अखेर तिच्या पाठीत नवे इम्पांटस्‌ लावण्याचे ठरले.

शस्त्रक्रियेनंतर आता मुलगी सामान्य व्यक्तीप्रमाणे चालू-बसू लागली आहे. तिच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. काही तपासण्यांनंतर तिला घरी सोडण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती जीटी रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक डॉ. धीरज सोनावणे यांनी दिली. 

अशी झाली शस्त्रक्रिया 
शस्त्रक्रियेदरम्यान मणक्‍यातील मज्जातंतू व नसांवर ताण येऊ नये यासाठी न्यूरोमॉनिटरिंग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. सुमारे सहा तास शस्त्रक्रिया चालली. जे. जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले आणि जी. टी. रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक डॉ. धीरज सोनावणे, डॉ. विपुल गर्ग, डॉ. ओंकार शिंदे, भूलतज्ज्ञ डॉ. श्‍वेता सोनावणे आदींच्या पथकाने शस्त्रक्रिया केली. 

स्कॅलिओसीस आजारामुळे केवळ मणक्‍यांनाच दुखापत होत नाही. हृदय आणि यकृताच्या कार्यावरही दुष्परिणाम होतो. दोन्ही अवयवांच्या कार्यपद्धती बिघडतात. हा आजार आनुवंशिकतेने येतो. ग्रामीण भागांत एखाद्या भागात तो प्रामुख्याने दिसून येतो. वेळीच उपचार केल्यास शस्त्रक्रिया टाळता येते. 
- डॉ धीरज सोनावणे, ऑर्थोपेडिक, जी.टी. रुग्णालय, फोर्ट 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com