16 वर्षीय अत्यवस्थ तरुणीला वाचविण्यात फोर्टिस मुलुंडच्या डॉक्‍टरांना यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

अत्यंत किचकट यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तरुणीला जीवनदान

मुंबई ः पल्मनरी हायपरटेन्शन आजाराने ग्रस्त असलेल्या आखाती
देशातील एका 16 वर्षीय तरुणीवर अत्यंत किचकट अशी शस्त्रक्रिया मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात नुकतीच यशस्वी पार पडली. त्यामुळे तिला जीवनदान मिळाले आहे. सारा असे नाव असलेल्या या मुलीवर अनेक देशांत उपचार करण्यात आले; मात्र तिच्या पालकांच्या पदरी निराशाच आली. अखेर फोर्टिसच्या डॉक्‍टरांनी केलेल्या उपचारामुळे तिची तब्येत पूर्ववत झाली आहे. 

आखाती देशात राहणाऱ्या साराला एके दिवशी शाळेमध्येच अचानक चक्कर आली. तिच्या तपासणीनंतर तिला "पल्मनरी हायपरटेन्शन' असल्याचे निदान झाले. अशा आजारामध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा धीम्या गतीने अथवा पूर्णपणे खंडित होतो. साराच्या पालकांनी तिला अखेर तुर्कस्थानमधील रुग्णालयात नेले, पण तिथेही त्यांची निराशा झाली. डॉक्‍टरांनी साराची तब्येत खूपच ढासळली असल्याचे सांगत तिला उपचारासाठी इतरत्र नेण्यासाठी सांगितले. प्रचंड तणावाखाली असलेल्या साराच्या पालकांनी अखेर तिला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात आणले. 

पेडिएट्रिक कार्डिओलॉजिस्ट व सल्लागार डॉ. स्वाती गारेकर आणि पेडिएट्रिक कार्डिअॅक सर्जन डॉ. धनंजय माळणकर यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. पल्मनरी हायपरटेन्शनमुळे साराची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. साराची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले. अखेर डॉक्‍टरांनी फुफ्फुस हृदय प्रत्यारोपणाची त्वरित गरज असल्याचे निष्कर्ष काढले. मात्र प्रत्यारोपणासाठी आणखीन काही काळ थांबावे लागत असल्यामुळे तज्ज्ञ डॉक्‍टर शिवाजी माळी, डॉ. श्‍याम ढाके यांच्या मार्गदर्शनाखालील चमूने पर्यायी व अत्यंत किचकट अशा वैद्यकीय प्रक्रियेच्या साहाय्याने साराच्या छातीमध्ये Reverse Pot Shunt लावले आणि हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्याचा अडथळा दूर केला.तद्नंतर सलाईनद्वारे इंजेक्‍शन व इतर औषधे देऊन तिची प्रकृती रूळावर आणली.  तीन दिवसानंतर सारावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 

याबाबत फोर्टीसच्या तज्ज्ञ डॉ. व पेडीऍट्रिक कार्डीओलॉजिस्ट डॉ. स्वाती गारेकर म्हणाल्या, साराला फोर्टीस मुलुंडमध्ये दाखल केले, तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर वैद्यकिय उपचार सुरु असताना देखील तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. त्यातून तिला पल्मनरी हायपरटेन्शनने ग्रासले असल्याचे निदान झाले. मात्र साराच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे आणि तिच्या पालकांच्या सहकार्यामुळे आम्ही साराला वाचवू शकलो. सारानेदेखील वैद्यकिय उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. परिणामी तिची तब्येत आता पूर्ववत झाली असून तिचा नुकताच 17वा वाढदिवसही साजरा करण्यात आला. साराला फोर्टीसमधून डिसचार्ज देण्यात आला असून सहा महिन्यानंतर फॉलोअपसाठी भारतामध्ये येण्यास सांगितले आहे.

हेही वाचा...कविताने फुलवले हास्याचे कारंजे..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: successful surgery on girl in mulund fortis hospital