'सनबर्न फेस्टिव्हल'ला अखेर मुंबई पोलिसांची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

मुंबई - आंतरराष्ट्रीय डीजे आणि संगीतकार डेव्हिड गुट्टी याच्या "सनबर्न फेस्टिव्हल'ला अखेर मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. रविवारी (ता. 15) हा कार्यक्रम वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ मैदानावर होणार आहे.

मुंबई - आंतरराष्ट्रीय डीजे आणि संगीतकार डेव्हिड गुट्टी याच्या "सनबर्न फेस्टिव्हल'ला अखेर मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. रविवारी (ता. 15) हा कार्यक्रम वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ मैदानावर होणार आहे.

डेव्हिड गुट्टी याचा "सनबर्न' हा कार्यक्रम मुंबईतील रेसकोर्स आणि जिओ मैदानात होणार होता. या कार्यक्रमाला महापालिकेने परवानगी नाकारली होती. आयोजकांनी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्‍यक होते. ती पूर्ण न झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी सनबर्नला परवानगी नाकारली होती. या कार्यक्रमाला कुणाचाही विरोध नसून आयोजकांनी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्‍यक होते. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी आयोजक पोलिसांकडे परवानगीकरता आले होते. वाहतूक पोलिस, अग्निशमन दल आणि महापालिकेच्या परवानगीची प्रत आयोजकांकडे नव्हती. आयोजक फक्त पत्र घेऊन आल्यामुळे त्यांना कार्यक्रमाकरता परवानगी नाकारली, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. विनापरवाना हा कार्यक्रम झाला असता तर आयोजकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली असती.

शुक्रवारी (ता. 13) सनबर्न कार्यक्रमाकरता अनेक जण जिओ मैदानावर आले होते; पण कार्यक्रमाला परवानगी नसल्यामुळे त्यांना परत जावे लागले. शनिवारी (ता. 14) आयोजकांनी कायदेशीर परवानग्यांची पूर्तता केली. त्यामुळे रविवारी (ता. 15) "सनबर्न' कार्यक्रम जिओ मैदानात होणार आहे. पुण्यात या सनबर्न फेस्टिव्हलला मोठा विरोध झाला होता. याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने आयोजकांना 62 लाखांचा दंड ठोठावला होता.

Web Title: sunburn festival permission by mumbai police