मुंबईकरांचा "सण्डे मुड'! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

सलग दोन दिवस पावसाने मुंबईला झोडपल्यानंतर रविवारी (ता. 30) उघडीप मिळाली होती. त्यामुळे पावसातील पहिला रविवार मुंबईकरांनी साजरा केला.

मुंबई - सलग दोन दिवस पावसाने मुंबईला झोडपल्यानंतर रविवारी (ता. 30) उघडीप मिळाली होती. त्यामुळे पावसातील पहिला रविवार मुंबईकरांनी साजरा केला. सकाळपासूनच ठिकठिकाणी मैदानात फुटबॉलचे सामने रंगले होते. मटण आणि चिकनच्या दुकानांसमोरही गर्दी दिसत होती. सायंकाळी समुद्र किनाऱ्यांवर अनेक कुटुंबांनी मक्‍याच्या कणसावर ताव मारला. 

दरम्यान, अवघ्या तीन दिवसांत पावसाने मुंबईचा जूनमधील कोटा पूर्ण केला आहे. मुंबईत जूनमध्ये सरासरी 505 मिलीमीटर पाऊस पडतो. शुक्रवारी पावसाने दमदार आगमन करत निम्मी मुंबई तुंबवली होती. शनिवारीही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सातांक्रूझ येथे यंदा 515 मि.मी. पाऊस झाला आहे, तर कुलाब्यात 341 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या नोंदीनुसार चेंबूरमध्ये 30 मि.मी., मुलुंडमध्ये 26 मि.मी. तर सांताक्रूझमध्ये 9.2 मि.मी. पाऊस झाला. 

शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. लोकलसेवाही खोळंबली होती. त्यामुळे अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातून लवकरच काढता पाय घेत घरची वाट धरली होती. जूनमध्ये अखेरच्या दिवसांत कोकणात समाधानकारक पाऊस पडल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. 

बुधवार-गुरुवारी मुसळधार 
सोमवारीही काही ठिकाणी पावसाचा जोर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. बुधवार-गुरुवारी पुन्हा दोन दिवस संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल, असेही सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunday mood for mumbaikar