वसई-विरारमध्ये पाण्याचा गोरखधंदा;अशुद्ध पाण्याची विक्री 

प्रसाद जोशी  
Wednesday, 28 October 2020

शुद्ध पाणी मिळेल या विश्‍वासाने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी महागड्या बंद बाटल्या खरेदी करत असतात; परंतु  वसई-विरारमध्ये अनेक ठिकाणी अशा बाटल्यांमधील पाणी अशुद्ध, पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे.

वसई  ः शुद्ध पाणी मिळेल या विश्‍वासाने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी महागड्या बंद बाटल्या खरेदी करत असतात; परंतु सावधान वसई-विरारमध्ये अनेक ठिकाणी अशा बाटल्यांमधील पाणी अशुद्ध, पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे. अशुद्ध पाणी विकून गोरखधंदा करणारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. अशा पाणी विक्रेत्यांवर महापालिकेने कारवाईसाठी कंबर कसली असून 18 पाणी विक्रत्यांची दुकाने सील केली आहेत. 

राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; चौकशीसाठी फडणवीसांचं ठाकरेंना पत्र

कार्यालय तसेच ज्या ठिकाणी महापालिकेचा पाणीपुरवठा होत नाही अशा गृहसंकुलात, इस्पितळ, संस्था आदी ठिकाणी महागड्या बंद बाटल्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जातात; परंतु यातही नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. कोणतीही पाण्याची तपासणी अथवा परवानगी न घेता राजरोसपणे पिण्याचे पाणी बाटलीत भरले जाते व बंद करून विकले जाते; परंतु हे पाणी शुद्ध आहे की अशुद्ध याची कोणतीच शहनिशा होत नाही. अनेक ठिकाणी टॅंकरने पाणी आणून ते साठवले जाते, नंतर बाटलीत टाकून बंद करून विक्री होत आहे. वसई, विरार, नालासोपारा, चंदनसार, बोळींज, पेल्हार, नवघर माणिकपूर, आचोळे व वालीव प्रभाग समितीत शेकडोच्या संख्येने पाणीविक्रेते पाणी विक्री करत आहेत; परंतु यात काहीजण नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर येत आहे. 

हिंदुत्व समजून घेण्याची ठाकरेंची बौद्धिक कुवत नाही; भाजप अध्यात्मिक आघाडीची टीका

चढ्या दराने पाणी बाटलीची विक्री 
वसई-विरार शहरातील भागात पाण्याची मोठी बाटली विकत घेण्यासाठी 40 ते 45 तर काही ठिकाणी 75 रुपये इतकी किंमत मोजावी लागते. मात्र पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून जिल्हा आरोग्यशाळेत पाण्याचे नमुने पाठवणे, पाणी पिण्यायोग्य आहे का याची खातरजमा करणे, महापालिका व प्रदूषण मंडळाची परवानगी, प्लांट स्वच्छ ठेवणे, असे नियम असताना देखील याचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे अशाच नियमांची उल्लंघन करणाऱ्या 18 ठिकाणी धाड टाकत पालिकेने विक्रेत्यांची दुकाने सील केली आहेत. 

वसई-विरार शहर महापालिकेच्या हद्दीत 18 पाणीविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून दुकाने सील केली आहेत. पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नमुन्यातून स्पष्ट झाले, अन्य ठिकाणी देखील पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. 
    वसंत मुकणे, आरोग्य अधिकारी, वसई-विरार महापालिका. 

वसई-विरार महापालिकेने बेकायदेशीर पाणी प्लांटवर कारवाई करण्यास सुरुवात केली; परंतु अद्यापही अनेक जण मोकाटपणे विक्री करत असल्याचे दिसते. अशा प्लांटवर देखील कारवाई झाली पाहिजे. 
 अशोक शेळके, युवा सहसंयोजक, महाराष्ट्र प्रदेश, भटके विमुक्त आघाडी. 

 

 

Supply of unclean water from bottled water in Vasai Virar

(संपादन ः रोशन मोरे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supply of unclean water from bottled water in Vasai Virar