मुंबईतील जैन मंदिरं 'या' दिवशी उघडणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पूजा विचारे
Friday, 21 August 2020

सर्वोच्च न्यायालयानं जैन धर्मियांना कोरोनाच्या काळात दिलासा दिला आहे. गणेशोत्सवासोबत त्यांचा पर्युषण पर्वही सुरू झाला आहे. जैन बांधवांना हा सोहळा साजरा करण्यासाठी जैन मंदिरांमध्ये जाण्याची परवानगी मिळाली आहे.

मुंबईः सध्या गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं तळं ठोकून आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. या काळात हॉटेलपासून मंदिरं बंद ठेवण्यात आली. यादरम्यान सण उत्सवावरही कोरोनाची बंधन आली. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून प्रत्येक सणासाठी सरकारकडून नियमावली ठरवली जाते. अशातच सर्वोच्च न्यायालयानं जैन धर्मियांना कोरोनाच्या काळात दिलासा दिला आहे. गणेशोत्सवासोबत त्यांचा पर्युषण पर्वही सुरू झाला आहे. जैन बांधवांना हा सोहळा साजरा करण्यासाठी जैन मंदिरांमध्ये जाण्याची परवानगी मिळाली आहे. 

येत्या 22 आणि 23 ऑगस्ट या पर्युषण काळातील शेवटच्या दोन दिवसांसाठी श्वेतांबर मूर्तिपूजक ट्रस्टची मुंबईतील मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली आहे. मुंबईतील भायखळा, दादर आणि चेंबूरमधील मंदिरं भाविकांसाठी खुली असतील. एकावेळी केवळ पाच भाविकांना प्रवेश देण्याचे निर्देशही देण्यात आलेत. हा निकाल केवळ पर्युषणापुरताच मर्यादित असेल असंही न्यायालयानं सांगितलं आहे. त्यामुळे इतर धर्मियांनी प्रार्थनास्थळं उघडण्याचा दावा करु नये, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय.

 

पर्युषण पर्वाचे शेवटचे दोन दिवस ही मंदिरं उघडण्यात यावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. त्यासोबतच मंदिरांमध्ये कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत कोरोनाच्या काळात समूह संसर्गाचा धोका कायम असल्याने पर्युषण काळात जैन मंदिरं खुली करण्याची परवानगी देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली होती.

 

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठानं हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देताना न्यायालयानं स्पष्ट सांगितलं आहे की, ही सवलत इतर मंदिरं खुली करण्यासाठी किंवा मोठी गर्दी होणाऱ्या गणेश चतुर्थी उत्सवासाठी (गणेशोत्सवासाठी) देता येणार नाही. दरम्यान यंदा गणेशोत्सव किंवा इतर सणांसाठी मंदिरांमध्ये भाविकांना उत्सव साजरा करता येणार नाही.

Supreme Court allows Jain temples Dadar Byculla Chembur in Mumbai open Paryushan on August 22 and 23


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court allows Jain temples Dadar Byculla Chembur Mumbai open Paryushan August 22 and23