सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणः सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच भाजप नेते ट्विटरवर अॅक्टिव्ह, निर्णयाचं 'असं' केलं स्वागत

पूजा विचारे
Wednesday, 19 August 2020

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी न्यायालायच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर राज्य सरकारवर चौफेर टीका देखील केली आहे. निकाल आल्यानंतर भाजपचे नेते ट्विटरवर तात्काळ अॅक्टिव्ह झालेत. 

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी न्यायालायच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर राज्य सरकारवर चौफेर टीका देखील केली आहे. निकाल आल्यानंतर भाजपचे नेते ट्विटरवर तात्काळ अॅक्टिव्ह झालेत. 

जाणून घेऊया भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया 

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !,या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा ! , असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे. 

भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. 'पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही. हा 'सिंघम'चा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांतसिंह रजपूतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नावलौकिक आणि ख्यातीप्रमाणे काम करू दिले नाही? मुंबई पोलिसांना कुणी बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात, पण सुशांतच्या प्रकरणात अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. या प्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?,' असे प्रश्न उपस्थित केलेत.

आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. मुंबई पोलिसांच्या तपासामागे असलेले छुपे चेहरे आता उघड होतील. लॉकडाऊनच्या काळात १५ हजार मुंबईकरांचा मृत्यू होत असताना मजा मारणाऱ्या 'पब अँड पार्टी'ची तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. आता न्याय होईल,' असं शेलार यांनी म्हटलं आहे.

आमदार नीतेश राणे यांनीही या निकालानंतर ट्वीट केलं आहे. त्यांच्या ट्वीटमुळं वेगळीच चर्चा रंगली आहे. नीतेश राणे यांनीही केवळ काही शब्दांचं ट्वीट केलं आहे. 'अब बेबी पेंग्विन तो गियो... इट्स शो टाइम' असं त्यांनी म्हटलं आहे. #JusticeForSSR असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. 

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर न घेणे दुर्दैवी आहे. सुशांतसिंह च्या परिवाराला न्याय मिळेल आणि ठाकरे सरकारची दादागिरी संपेल” असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.

भाजप आमदार राम कदम यांनी निकालाच्या आधीच महाराष्ट्र सरकारला करारा झटका मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयानं दिलेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचे पालन केले पाहिजे आणि मदत केलीच पाहिजे, असे आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. 

Supreme Court orders CBI investigation Sushant Singh Rajput death case maharashtra bjp leader reaction


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court orders CBI investigation Sushant Singh Rajput death case maharashtra bjp leader reaction