सुप्रिया सुळे विखुरलेली राष्ट्रवादी सावरणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

विखुरलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सावरण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे शनिवारी (ता.31) नवी मुंबईत येणार आहेत.

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांनी कुटुंबीयांतर्फे राष्ट्रवादीतून काडीमोड घेण्याच्या पार्श्‍वभूमीवर विखुरलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सावरण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नवी मुंबईत येणार आहेत. शनिवारी (ता.31) राष्ट्रवादीतर्फे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यानिमित्ताने त्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. नाईकांच्या प्रवेशाच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच सुळे नवी मुंबईत येणार असल्याने काय बोलणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सुरू असलेल्या संवाद यात्रेतून सुळे तरुणांसहित महिलांशी संवाद साधत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी नवी मुंबईचा दौरा नियोजित केला आहे. नाईक कुटुंबीय राष्ट्रवादीत असताना माजी खासदार संजीव नाईक हे त्यांचे निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जात होते; परंतू त्यांचे धाकटे बंधू आमदार संदीप नाईक भाजपवासी झाल्यामुळे नाईकांचे संबंध दुरावले आहेत.

संदीप नाईक यांच्यापाठोपाठ गणेश नाईक व संजीव नाईक हेदेखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतू त्यावर नाईक कुटुंबीयांपैकी कोणीच स्पष्टीकरण न दिल्यामुळे त्यांचा भाजपप्रवेश निश्‍चित समजला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुळे काय बोलतील, याची उत्सुकता नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना लागली आहे.

सकाळी रोजगार मेळाव्याच्या उद्‌घाटनानंतर सुळे नेरूळ येथील वृद्धाश्रमास भेट देणार आहेत. तसेच नवी मुंबईतील महाविद्यालयात विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी दिली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे युवानेते पार्थ पवार, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

शनिवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून नेरूळ येथे रोजगार मेळाव्याला सुरुवात होणार आहे. तसेच मेळाव्यात नोकरीसाठी आलेल्या युवक-युवतींच्या नावनोंदणीनंतर थेट मुलाखती होऊन पात्र युवकांना तत्काळ नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. 

या रोजगार मेळाव्यात नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईतील 50 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी नापासपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बेरोजगार युवकांना या मेळाव्यात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 
-अशोक गावडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule will work to reunite scattered nationalists