सुरव तर्फ तळे ग्रामपंचायतीकडे सरकारचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

तालुक्‍यातील सुरव तर्फ तळे गाव ग्रामपंचायतीतील गावे अनेक वर्षांपासून शासकीय कामापासून वंचित आहेत.

माणगाव (वार्ताहर) : तालुक्‍यातील सुरव तर्फ तळे गाव ग्रामपंचायतीतील गावे अनेक वर्षांपासून शासकीय कामापासून वंचित आहेत. सरकारच्या अनेक योजना तालुक्‍यात तर येत असतात, मात्र त्या कामांना मंजुरी मिळत नसल्याने सरकारच्या या कार्यपद्धतीवर ग्रामपंचायत स्तरावर नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

सरकार विविध स्तरावर अनेक योजना तालुक्‍यामध्ये आणत आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून तालुक्‍याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी कामांची मागणी करूनही त्यांना मंजुरी मिळत नाही. या गावांमध्ये शासकीय नळपाणी पुरवठा अद्याप मंजूर नाही. ग्रामपंचायतमध्ये तीन गावे व एक आदिवासी वाडी येते. प्रत्येक गावात व वाडीमध्ये स्वदेश फाऊंडेशनमार्फत स्वतः रक्कम उभी करून पाणी योजना सुरू केली आहे. नदीवरही स्वदेश फाऊंडेशनमार्फत बंधारा बांधण्यात आला आहे.

जिल्हा परिषद कार्यालयात या ग्रामपंचायतीची नळपाणी पुरवठेची फाईल धूळ खात पडलेली आहे. पाणी पुरवठा योजना यादीत नाव असूनही ती प्रतीक्षा यादीत आहे. या गावांमध्ये गटार, सांडपाणी, दूषित पाणी निवारण योजनेसाठी कोणत्याही प्रकारची योजना राबवली जात नाही. वाढीव इलेक्‍ट्रिक खांब मागणी करूनही मिळत नाहीत. माणगाव पंचायत समिती सदस्य तीन वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे काम त्यांच्या फंडातून करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर या ग्रामपंचायतीतील सर्व ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.

यापूर्वी दिवंगत बाबुराव भोनकर यांनी मोर्बा ते सुरव रस्ता मंजूर करून काम केले होते; परंतु तो रस्ता आता संपूर्ण खड्डेमय झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा उपयोग केला जातो. या रस्त्यालगत मोठी नदी असून, तेथे साकव नसल्यामुळे नदीला पूर आला की रस्ता वाहून जातो. अनेकदा खरवली, लहाने सुरव, राजवली, नाईटने या गावांचा संपर्क तुटलेला असतो. या वर्षीच्या पुराच्या पाण्यामध्ये खरवली येथील दोन महिला या रस्त्यावरून जात असताना वाहून गेल्या होत्या. त्यापैकी एक मृत झाली आणि एक महिला झाडावर रात्रभर बसून राहिली. त्याच्यामुळे तिचा जीव वाचला. याशिवाय, एक पुरुषही या पाण्यामध्ये वाहून गेला.
या विभागातील ९० टक्‍के नागरिक हे राष्ट्रवादीला मानणारे आहेत. या ग्रामपंचायतीवर १५ वर्षांपासून राष्ट्रवादीचे सरपंच विराजमान आहेत. त्‍यामुळे ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.

गावात काही कामे सुरू आहेत. काही कामांना मंजुरी जिल्हा परिषदेकडून मिळालेली आहे. आचारसंहितेमुळे कामे सुरू करता येत नाहीत. ग्रामपंचायती अंतर्गत ज्या समस्या असतील, त्या लवकरच सोडवल्या जातील.
अल्पा नीलेश जाधव, सरपंच, सुरव तर्फ तळे

ग्रामपंचायत हद्दीत जी काही विकासकामे आहेत, ती कामे ग्रामपंचायतीने लवकरच पूर्ण करावी. जेणेकरून नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
सीताराम भोनकर, ग्रामस्थ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surav tarf tale Grampanchaya ignore by Government