मुलगा दूर गेल्याच्या शल्यातून केला खून

मुलगा दूर गेल्याच्या शल्यातून केला खून

ठाणे - पतीचे छत्र हरपल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांच्या मुलाला हालअपेष्टा सोसत वाढवला. मुलगा मोठा झाल्यावर सुखाचे दिवस येतील, अशी आशा होती; मात्र, चार वर्षांपूर्वी मुलाचे लग्न झाल्यानंतर मुलाने आपल्याकडे दुर्लक्ष करत पत्नी व सासूलाच जास्त मान देण्यास सुरुवात केली. याची सल रशिदा हिच्या मनात साडेतीन वर्षांपासून होती. त्यातून तिने सून व विहिणीचा बदला घ्यायचे ठरविले. ती संधी रशिदाने सोमवारी सायंकाळी साधल्याचे पोलिसांना तपासात सांगितले.

रशिदाने सून व विहिणीच्या केलेल्या खुनाने काही महिन्यांपूर्वी कासारवडवली येथील हसनैन वरेकरने घडविलेल्या हत्याकांडाची आठवण झाली. सून-विहिणीचे गळे चिरून दोन लहान मुले घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या रशिदाच्या कृत्याने काही क्षण पोलिसही हादरले होते. मुंब्रयात वास्तव्य करणाऱ्या रशिदा अकबरअली वसानी यांच्या पतीचे निधन झाले, त्या वेळी त्यांचा मुलगा मकदूम हा अवघा अडीच वर्षांचा होता. रशिदा यांनी मकदूमला मोठ्या हालअपेष्टा सोसत वाढवले. मकदूम मोठा झाल्यावर आपल्याला सुखाचे दिवस येतील, या आशेत त्या होत्या. काबाडकष्ट करीत मकदूमला डिप्लोमा इंजिनिअरपर्यंत शिक्षण दिले. त्याला नोकरी मिळाल्यावर कुर्ला येथील सलमा शेखबरोबर त्याचा निकाह केला. आता आपले सुखाचे दिवस सुरू झाले, असे त्यांना वाटू लागले. मात्र काही काळातच घरगुती भांडणांना कंटाळून मकदूम पत्नीसह कुर्ला येथे राहण्यास गेला. त्याला दोन वर्षांपूर्वी मुलगाही झाला. तो आईच्या संपर्कात असे; मात्र मुलगा जवळ राहत नसल्याने त्या नैराश्‍यात होत्या. सून सलमा व तिची आई शमिमा यांनी मकदूमला खाण्यात काही तरी देऊन त्याला वश केले असल्याचा रशिदा यांचा समज होता. त्यांचा हा समज दिवसेंदिवस वाढतच गेला. 


दरम्यानच्या काळात, मकदूमने पुन्हा मुंब्रा येथे राहण्याचा निर्णय घेऊन सिमला पार्क येथील सहयोग टॉवरमध्ये भाड्याने फ्लॅट घेतला. त्याला 40 दिवसांपूर्वी मुलगी झाली. तिच्या नामकरणानिमित्ताने मकदूमची सासू शमिमा मुंब्रयात आली होती. काही कामानिमित्ताने मकदूम घराबाहेर गेल्यावर रशिदाने जेवणात गुंगीचे औषध देऊन सून व विहिणीचे गळे चिरले.
 

या हत्याकांडानंतर ती शांतपणे मुंब्रा पोलिस ठाण्यात आली. आपल्याला सून व विहिणीला ठार मारायचेच होते. आपण ठरविल्याप्रमाणे दोघींचेही गळे चिरले, अशी कबुली तिने वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र तायडे यांच्याकडे दिली. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com