सुशांत सिंह आत्महत्या तपास मुंबई पोलिसांकडेच; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा | Thursday, 30 July 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहिला आहे. मुंबई पोलिसांना त्यांचे काम करु द्या, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळली.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहिला आहे. मुंबई पोलिसांना त्यांचे काम करु द्या, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळली.

रिया चक्रवर्तीला मुंबई पोलिसांमधीलंच कुणीतरी मदत करतंय - 

सुशांत सिंहच्या आकस्मिक मृत्युमुळे (14 जून) सर्वत्र विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे जनभावना पाहता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका एड अलका प्रिया यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. याचिकेवर आज सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. मुंबई पोलिसांना त्यांचे काम करू द्या, जर तपासाबाबत काही मुद्दे असतील तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका करू शकता, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सुशांतने लहान मुलांना नासाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून चांगले काम केले आहे. त्यामुळे त्याच्या मृत्युची सीबीआय चौकशी हवी, असा युक्तिवाद याचिकादाराने केला. मात्र, तो चांगला होता की नाही याच्याशी तपासाचा काही संबंध नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

...म्हणून नाट्यगृहे लवकर सुरु करा; जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची मागणी...

दरम्यान, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली पाटणा मधील फौजदारी फिर्याद मुंबईला वर्ग करावी अशी मागणी केली आहे. यामध्ये आता सुशांतच्या वडिलांनी कॅव्हिएट दाखल केले आहे. आमची बाजू ऐकल्याशिवाय याचिकेवर निर्णय देऊ नये अशी मागणी केली आहे. सुशांतची करोडो रुपयांची मालमत्ता रियाने हडप केली, अशी फिर्याद सिंह यांनी नोंदविली आहे. मुंबई पोलिसांनी सुमारे चाळीस जणांचा जबाब नोंदविला आहे.

---------------------------------

Edited by Tushar Sonawane