सावधान; आता अंडीही नकली!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

मंदार मिंगळे यांनी रविवारी विरार पश्‍चिमेकडील जेमिनी एग्ज अँड चिकन सेंटरमधून आठ गावठी अंडी घेतली. त्यांच्या पत्नी माया यांनी त्यातील एक अंडे फोडायला घेतले; मात्र ते सहज न फुटल्याने त्यांनी उलथण्याने फोडण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नाने ते फुटले. तेव्हा त्यात मिंगळे यांची चार बोटे आत गेली.

नालासोपारा : कल्याण-डोंबिवली परिसरात अंड्यात प्लास्टिकसदृश पदार्थ आढळल्याची घटना ताजी असतानाच विरारमधील एका ग्राहकालाही गावठी अंड्याबाबत असाच काहीसा अनुभव आला. ही अंडी नकली असावीत, असा त्या ग्राहकाचा कयास आहे.

विरारमधील सेंट्रल पार्क परिसरात राहणाऱ्या मंदार मिंगळे यांनी रविवारी विरार पश्‍चिमेकडील जेमिनी एग्ज अँड चिकन सेंटरमधून आठ गावठी अंडी घेतली. त्यांच्या पत्नी माया यांनी त्यातील एक अंडे फोडायला घेतले; मात्र ते सहज न फुटल्याने त्यांनी उलथण्याने फोडण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नाने ते फुटले. तेव्हा त्यात मिंगळे यांची चार बोटे आत गेली. या अंड्यातून पिवळसर पांढऱ्या रंगाचा बलक बाहेर आला. त्या बलकाला थोडासा लालसर रंगही होता. त्याला वासही येत होता. आम्लेट बनवण्यासाठी ते बलक तव्यावर टाकल्यानंतर तडतड असा आवाज येऊ लागला. तयार झालेले आम्लेट तोडण्याचा प्रयत्न केला असता ते रबरासारखे ताणले गेले. उरलेल्या सातपैकी काही अंड्यांबाबतही त्यांना तसाच अनुभव आला. 


आम्ही वाडा, मोखाडा परिसरातून अंडी आणून ती घाऊक भावाने विकतो. आमच्या दुकानातील अंडी नकली असूच शकत नाहीत.
- रफीक, मालक, जेमिनी एग्ज अँड चिकन सेंटर, विरार


डोंबिवलीतील ती अंडी एफडीएच्या ताब्यात  
डोंबिवलीतील गोग्रासवाडी तसेच कल्याण तालुक्‍यातील दहिसर गावातील नागरिकाला अंड्यात प्लास्टिकसदृश पदार्थ आढळल्यानंतर डोंबिवलीजवळील दावडी गावातील रहिवासी नवनाथ लोखंडे यांनाही सोमवारी (ता.१०) असा अनुभव आला. त्यांना याबाबत मानपाडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाला कळवले. एफडीएच्या ठाणे येथील पथकाने लोखंडे यांच्याकडील अंडी ताब्यात घेतली आहेत. या अंड्यांची प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे. आम्ही प्रयोगशाळेचा अहवाल येण्याची प्रतीक्षा करत आहोत, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या अंड्यांबाबत काय अहवाल यतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Web Title: Suspected fake eggs found in Mumbai