वैद्यकीय महाविद्यालयांकडून संशयास्पद माहिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मुंबई - राज्यातील नऊ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी सरकारच्या नियमावलीप्रमाणे कोटानिहाय जागा भरण्यास नकार दिल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) चांगलाच दणका दिला आहे. या नऊपैकी दोन महाविद्यालयांनी आपल्याकडे किती जागा आहेत, याविषयी दिलेली माहिती संशयास्पद असल्याने दोन दिवसांत पुन्हा माहिती पाठवावी, असे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिले आहेत.

सरकारतर्फे जागा भरण्यास नकार देणाऱ्या नऊ महाविद्यालयांना प्रवेश देण्यास "डीएमईआर'ने स्थगिती दिली होती. धुळे, नाशिक, अमरावती, पुणे, नागपूर, संगमनेर, अहमदाबाद, तळेगाव आणि लातूरमधील महाविद्यालयांनी आपल्या कोट्यातील जागांबाबत माहिती दिली; मात्र तळेगाव आणि लातूरमधील महाविद्यालयांची माहिती संशयास्पद वाटते, असे डीएमईआरचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. या महाविद्यालयांनी सोमवारपर्यंत जागांबाबत माहिती द्यावी, असा आदेश दिल्याची माहिती डॉ. शिनगारे यांनी दिली.

Web Title: suspected information by medical college