सरळगावात जॅमर मोहिम स्थगित

नंदकिशोर मलबारी
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुरबाड शहराच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केल्याने होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीने रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना 15 ऑगस्ट 2018 पासून जाॅबर लावून दंड वसूल करण्याची सुरवात केली होती.

सरळगांव (ठाणे) - 15 ऑगस्ट पासून गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली जॅमर मोहीम काही काळासाठी स्थगित केल्याने जनतेकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगराध्यक्ष वापरत असलेल्या गाडीलाच जॅमर लावल्याने ही कारवाई थंड झाली का? असाही प्रश्न दंड झालेल्या मोटरसायकल मालकांमध्ये चर्चेली जात आहे.     

मुरबाड शहराच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केल्याने होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीने रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना 15 ऑगस्ट 2018 पासून जॅमर लावून दंड वसूल करण्याची सुरवात केली होती. मात्र ही दंडात्मक कारवाई कायदेशीर बाबीची पुर्णता न करताच जॅमर लावण्याचा व दंड वसूल करण्याचा घाईघाईने घेतलेला हा निर्णय नगरपंचायतीच्या चांगलाच अंगलट आला. 

पहिल्या दिवसापासूनच जॅमर लावण्यावरून वादाला सुरवात झाली होती. पण ही कारवाई चांगली असल्याने अनेक जाणकार मंडळींनी या कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली. चारचाकी वाहन व मोटरसायकल यांना सारखाच दंड ठेवल्याने नगर पंचायतीचे कर्मचारी व वाहान मालकात वादही होऊ लागले होते. हे वाद सुरू असतानाच नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष शीतल तोंडलिकर यांनी नगर पंचायतीची वापरत असलेली महाराष्ट्र शासन लिहिलेली गाडी रस्त्यावरच उभी केल्याने त्याच्याही गाडीला जॅमर लाऊन 200 रू. दंडही करण्यात आला होता. त्या दिवसापासून जॅमर मोहीम थंडावल्याने शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून ही मोहीम पुन्हा सुरू केली जाईल, असे नगरपंचायतीच्या वतीने सांगितले जाते.
               

Web Title: Suspended Jamar campaign in Saralgaon Thane