Mumbai : नगरसेविका लीना गरड यांचे निलंबन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

panvel

नगरसेविका लीना गरड यांचे निलंबन

पनवेल : महापालिकेच्या प्रभाग ५ मधून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेविका लीना गरड यांना अखेर पक्षातून सहा वर्षांकरिता निलंबित करण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून गरड यांच्याकडून पक्षविरोधी भूमिका घेतली जात असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.

पनवेल महापालिका ही ठाकूर कुटुंबाची खासगी मालमत्ता असल्याची टीका काही दिवसांपूर्वी करणाऱ्या नगरसेविका लीना या मागील काही दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर नाराज असल्याचे पाहायला मिळत होते. विद्यमान महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा अडीच वर्षाचा महापौरपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर महापौरपद खुल्या वर्गातील महिलांकरिता राखीव करण्यात आल्याने महापौरपद आपल्याला मिळावे, याकरिता प्रयत्न करणाऱ्या गरड यांना वरिष्ठांकडून महापौरपद नाकारण्यात आल्याने त्‍या नाराज होत्‍या.

पनवेल महापालिका प्रशासनाने आकारलेल्‍या मालमत्ता करालाही त्‍यांनी उघड विरोध करीत पालिका सभागृहातही पक्षाविरोधात भूमिका घेत विरोधी बाकावर बसणे पसंत केले. अखेर गरड यांना पक्षातून सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात आल्याचे पत्र भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (ता. १६) गरड यांना पाठविले. त्‍यामुळे आता गरड पुढील राजकारण भाजपविरोधातील पक्षात प्रवेश करून पुढे नेतात की गरड अध्यक्ष असलेल्या कॉलनी फोरमच्या माध्यमातून पुढील वाटचाल करतात, हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.

गरड या पक्षविरोधी भूमिका बजावत असल्याबद्दलची माहिती पक्षश्रेष्ठींना कळवली होती तसेच याबाबतचा खुलासा करण्याची सूचना त्‍यांना करण्यात आली होती. मात्र या सर्व प्रक्रियेदरम्यान उशीर लागल्याने तसेच आमच्या स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींनी आता दिल्याने गरड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल

माझ्या निलंबनाबाबत पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत पत्र मिळालेले नाही. त्यामुळे पत्र वाचल्याशिवाय प्रतिक्रिया देता येणार नाही. महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीत मोडणाऱ्या प्रभागापैकी सर्वात जास्त मताधिक्याने, ज्या जनतेने मला निवडून दिले, त्‍या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी माझा लढा चालूच राहील.

- लीना गरड, नगरसेविका

loading image
go to top