मिठाई महागली, चॉकलेटला पसंती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

सफेद पेढा ४०० रुपये किलो, केसर पेढा, मलाई पेढा ५०० रुपये किलो, बर्फीचेही दर वाढले असून पिस्ता, मलाई बर्फी ६०० रुपये किलोपर्यंत आहे. काजू कतली ६५० रुपये किलो आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करायची कशी? असा प्रश्‍न सर्वसामन्यांना पडत आहे.

नवी मुंबई : दिवाळीसाठी मिठाईच्या दुकानांत गोडधोड पदार्थाची रेलचेल सुरू असून, मिठाईचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या पदार्थांची खरेदी करताना ग्राहकांचे तोंड कडू पडत आहे. बाजारात साधारण मिठाई ४०० ते १२०० रुपये किलो आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १०० ते १५० रुपये किलोमागे मिठाईची भाववाढ झाली आहे. सफेद पेढा ४०० रुपये किलो, केसर पेढा, मलाई पेढा ५०० रुपये किलो, बर्फीचेही दर वाढले असून पिस्ता, मलाई बर्फी ६०० रुपये किलोपर्यंत आहे. काजू कतली ६५० रुपये किलो आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करायची कशी? असा प्रश्‍न सर्वसामन्यांना पडत आहे.

चोकोबार रोल ५५० रुपये, तर ड्रॉयफुटच्या कलिंगड, स्ट्रॉबेरी, संत्री, मॅंगो, आकाराची मिठाई १००० रुपये किलोच्या दराने विकली जात आहे. मोतीचुर, चुरमा लाडू ४०० रुपये किलो असून, सोनपापडी बदामी सोनपाडी ३५० रुपये किलो आहे. खोबऱ्याचे लाडू ४२० रुपये किलो आहे; तर दिवाळीसाठी स्पेशल सुकामेवा मिक्‍स खास मिठाईची पाकिटे उपलब्ध असून ९०० रुपये किलोपर्यत उपलब्ध आहेत. तसेच बाजारात साखर नसलेली मिठाईदेखील असून, त्याचे दर ५०० रुपये किलोपर्यंत आहे.
नवी मुंबईतील मॉलमध्ये फ्लेवर, विविधरंगी चॉकलेटचे आकर्षक गिफ्टपॅक खरेदीदारांना भुरळ पाडत आहे. विविध आकाराच्या खोक्‍यांमध्ये कागदी किंवा कापडी आवरणात हे चॉकलेट बांधून दिले जात आहेत. चॉकलेटची चलती लक्षात घेऊन दुकांनामध्येही त्यांचीच रेलचेल दिसून येत आहे. काही बेकरीवाले घरातच चॉकलेट बनवत असून, महिला बचत गटाच्या माध्यामातूनदेखील चॉकलेट बनवण्यात येत आहेत. रंगबेरंगी झगमगीत कागदात गुंडाळून ही चॉकलेट लहान-मोठ्या खोक्‍यांमध्ये भरली जात आहे. प्लेन चॉकलेट, ॲनिमल बटरफ्लाय, व्हलिव्ह, ट्रेन्गल, स्टार आदी प्रकारातील चॉकलेट फ्लेव्हरमध्ये उपलब्ध आहेत. 

दुधाच्या भावासह साखर, काजू, बदाम, पिस्ता यांच्या भावामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कामगारांचादेखील रोज वाढत असल्याने मिठाई महाग झाली आहे. मिठाईचे भाव वाढल्यामुळे आकर्षक अशा बॉक्‍समध्ये मिठाई भरून देण्यात येते. यामुळे मिठाईचे वजन कमी व बॉक्‍सचे वजन जास्त वाटते.
- नेहाल परदेशी, मिठाई विक्रेता
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sweet expensive, chocolate is accolate