आवक वाढल्याने मोसंबी १५ रुपये प्रतिकिलो

आवक वाढल्याने मोसंबी १५ रुपये प्रतिकिलो

वाशी - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) काही दिवसांपासून दररोज मोसंबीची ४०  टेम्पो आवक होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दर घसरले आहेत. गेल्या आठवड्यात प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये भाव होता. तो आता १५ ते २० रुपये झाला आहे. 

औरंगाबाद आणि हैद्राबाद येथून एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबी येत आहे. दररोज २९ टेम्पोद्वारे सरासरी १ हजार ९०० क्विंटल मोसंबी येत आहे. 

भाव घसरल्यानंतरही मागणी वाढलेली नसल्याने काही दिवसांत ते आणखी घसरण्याची शक्‍यता आहे. 

शक्तिवर्धक फळ
सध्या बाजारात मोसंबीची आवक भरपूर झाली आहे. त्याचा वापर सरबत, जॅम, जेली, मुरंबा, लोणचे आदी खाद्यपदार्थात करू शकतो. मोसंबी म्हणजे आजारपणात खायचे फळ असा सर्वसामान्यांचा समज आहे; पण निरोगी माणसांनीसुद्धा मोसंबी खावीत. तिच्या सेवनाने अशक्तपणा, थकवा लवकर भरून येतो. मळमळणे, उलटी होणे यावर मोसंबी चावून खावीत. त्यामुळे फोडींचा चोथा पोटात जातो. पोट साफ होण्यास मदत होते. मोसंबीमध्ये ए., सी. ही जीवनसत्वे आहेत. लोह, कॅल्शियम, कार्बोहॅड्रेट आणि प्रोटिन्स भरपूर प्रमाणात आहेत, अशी महिती पाककला तज्ज्ञ सुनीता मिरासदार यांनी दिली.

मोसंबीच्या वड्या बनवून पाहा...
साहित्य - दोन मोसंबी, अर्धी वाटी नारळचव, एक वाटी साखर, एक चमचा तूप, काजू तुकडा, अर्धा चमचा वेलची पूड.

कृती - मोसंबी सोलून बिया काढून पाकळ्या सोलाव्यात, नारळचव, साखर मिक्‍सरमधून फिरवावे. मोसंबी पाकळ्या घालून एकदा फिरवावे. पाकळ्या अलगद फिरवाव्यात. पाकळ्या बारीक करू नयेत. पॅनमध्ये एक चमचा तुपावर नारळचव, साखर, पाकळ्याचे मिश्रण घालून शिजवावे. सारखे हलवावे, मिश्रण खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. मिश्रण घट्ट झाले की वेलची पूड घालून ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण जाडसे थापावे. वरून काजूतुकडा दाबावा. थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापाव्यात. मोसंबी वडी पौष्टिक असून रोज सकाळी दुधाबरोबर वडी खावी. वडीच्या मिश्रणात दोन चमचे खवा, चिमूटभर केशरी रंग घालावा. वडीला रंग छान येतो.

डिझेल दरवाढीमुळे व्यापारी हैराण आहेत. त्यातच फळे, भाज्यांची मागणी कमी झाल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. शिल्लक राहिलेला माल भाव आणखी कमी करून विकण्याशिवाय पर्याय नाही. 
- समशेर आलम, व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com