वाचा काय आहे हापूस प्रेमींसाठी गोड बातमी...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

फळांचा राजा असणाऱ्या हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

नेरूळ - फळांचा राजा असणाऱ्या हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जागतिक तापमान वाढीचा फटका बसत असल्याने हापूसची आवक कमी होत होती. त्यामुळे आवक कमी आणि भाव अधिक अशी परिस्थिती होती. मात्र गुरुवारी (ता.12) वाशी येथील फळबाजारात हापूस आंब्याची यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आवक झाली. तब्बल चार हजार पेट्या बाजारात दाखल झाल्याने भावही निम्म्याहून कमी झाले आहेत. 

हेही वाचा - तुला कोरोना झालाय, घराबाहेर पडू नकोस! संदेशांमुळे युवक त्रस्त...

जागतिक तापमान वाढीच्या झळा यंदा कोकणातील हापूस आंब्यालादेखील बसू लागल्या होत्या. त्यामुळे या हंगामात केवळ 30 टक्‍क्‍यांपर्यंतच उत्पादन हाती येण्याची शक्‍यता व्यापारी आणि बागायतदारांनी व्यक्त केली होती. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये अवघ्या 200 ते 250 पेट्यांचीच नोंद मार्केटमध्ये झाली होती. त्यामुळे 5 किलोच्या पेटीला आंब्याच्या आकारानुसार 5 ते 9 हजार रुपये इतका दर मिळत होता. त्यातच यंदा एपीएमसी बाजारात हापूसचा हंगामही दीड महिना उशिरा सुरू झाल्याने पुढील काळातही आवक कमीच राहणार असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे आंबा प्रेमींमध्ये निराशेचे वातावरण होते. मात्र अशात गुरुवारी (ता.12) तब्बल चार हजार पेट्यांची आवक बाजारात झाली.

हेही वाचा - यशस्वी उपचारानंतरही कुटुंबीय त्यांना स्वीकारत नाहीये!

यंदाच्या वर्षांतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी आवक आहे. यामुळे हापूसच्या पेट्यांचे भावही निम्म्याहून अधिक कमी झाले आहेत. त्यामुळे 5 ते 6 डझनच्या पेटीला आंब्याच्या आकारानुसार 2 ते 6 हजार रुपये इतका भाव मिळू लागला आहे. आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथून हापूस बाजारात दाखल झाला आहे. 

यंदा पाऊस लांबल्याने व तापमान वाढीमुळे बाजारात कमी प्रमाणात हापूस आंबा येत होता. मात्र गुरुवारी चार हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता पूरक प्रमाणात आंबा बाजारात असून 10 एप्रिलनंतर ही आंब्याची आवक आणखी वाढेल. 
- नामदेव मुळे, फळ व्यापारी, एपीएमसी मार्केट. 

web title : sweet news for mango lovers mango prices droped in mumbai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sweet news for mango lovers mango prices droped in mumbai