जमीन गैरव्यवहारप्रकरणी उरण तहसीलदारांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नोटीस देऊनही तहसीलदार कल्पना गोडे दोन्ही वेळा सुनावणीस गैरहजर राहिल्या. त्यामुळे त्यांच्याबाबत या प्रकरणात चर्चेला उधाण आले आहे.

उरण (बातमीदार) : उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी खोट्या वारस दाखल्याच्या आधारे ट्रस्टच्या नावे असलेली उरण तालुक्‍यातील म्हातवली येथील जमीन डोसू भिवंडीवाला यांच्या नावे केली. तसेच २० एकर जमीन  १६ कोटी रुपयांना विकली असल्‍याचा आरोप करुन त्‍यासंदर्भात चौकशी करण्याबाबतचा अर्ज उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना दिला होता. 

याबाबतची सुनावणी मंगळवारी (ता. ५) उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयात ठेवण्यात आली होती; मात्र तहसीलदार कल्पना गोडे या सुनावणीस गैरहजर राहिल्या.

 पहिल्या सुनावणीला त्यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी म्हणून उरणचे मंडळ अधिकारी मोहिते उपस्थित होते; मात्र दुसऱ्या सुनावणीलासुद्धा तहसीलदार अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे तक्रारदार सुधाकर पाटील यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेण्याची विनंती प्रांतांना केली असून त्यांनी ती मान्य केली आहे. पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे.  याबाबत तहसिलदार कल्‍पना गोडे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

७/१२ च्या उताऱ्यावरून ट्रस्टचे नाव कमी करता येणार नाही. तसेच जमीन एका व्यक्तीच्या नावे करता येणार नाही असा लेखी अभिप्राय मंडल अधिकारी उरण यांनी दिला होता. तसाच अभिप्राय भूमी आलेख अधिकारी उरण यांनीही दिला आहे. असे असतानाही उरण तहसीलदार यांनी गैरहेतूने आदेश काढले आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, अशी मागणी मुख्य सचिवांना केली आहे.
- सुधाकर पाटील, तक्रारदार, अध्यक्ष, उरण सामाजिक संस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tahsildar inquiry into land misconduct