श्रीवर्धनचे तहसीलदार सूर्यवंशी यांची बदली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

श्रीवर्धनचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली चिपळूण येथील तहसील येथे झाली आहे. 

श्रीवर्धन (बातमीदार) : श्रीवर्धनचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली चिपळूण येथील तहसील येथे झाली आहे. 

सूर्यवंशी यांनी २०१६ रोजी श्रीवर्धन तहसीलचा कार्यभार स्वीकारला. त्यांचा मनमिळावू स्वभाव व कामाप्रती असणारी निष्ठा यामुळे तालुक्‍यामध्ये ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. श्रीवर्धन तालुका हा तसा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत समस्या, रास्त दुकानामार्फत पुरवले जाणारे धान्य, नागरिकांना वेळोवेळी लागणारे विविध दाखले, याकडे त्‍यांनी जातीने लक्ष दिले. याशिवाय, वैद्यकीय कारणासाठी एका गरीब गरजू कुटुंबाला तहसीलचा दाखल्याची आवश्‍यकता होती हे लक्षात येताच त्यांनी रात्री १२ वाजता दाखला देऊन त्या कुटुंबाची होणारी गैरसोय दूर केली. कर्तव्याला प्राधान्य देऊन ते पूर्ण करण्यासाठी धडपडणारा अधिकारी आणि कर्तव्याप्रति निष्ठा असणारा एक प्रेमळ अधिकारी म्हणून जयराज सूर्यवंशी यांची ओळख श्रीवर्धन तालुक्‍यात आहे.

निरोप समारंभात आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, कर्तव्य बजावत असताना माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी दिलेले प्रेम, सहकार्य आणि श्रीवर्धन तालुक्‍याने माझ्यावर पालक म्हणून केलेले प्रेम या ऋणाची उतराई होणे शक्‍य नाही. या वेळी उपस्थितांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tahsildar Jaywant Suryvanshi of Shrivardhan has Transferred