दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच घ्या! शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा वेबिनारमध्ये सूर

तेजस वाघमारे
Monday, 12 October 2020

दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन, अभ्यासक्रम आणखी कमी करण्याची आवश्‍यकता आहे का, अशा विविध प्रश्‍नांवर या वेबिनारमध्ये चर्चा झाली.

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षा घेण्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. परीक्षेबाबत शिक्षण विकास मंचातर्फे आयोजित एका वेबिनारमध्ये शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी दहावी-बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांना शाळांमध्येच परीक्षा केंद्र दिल्यास परीक्षा सुरळीत पार पाडता येतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. 

आरे आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती - 

दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन, अभ्यासक्रम आणखी कमी करण्याची आवश्‍यकता आहे का, अशा विविध प्रश्‍नांवर या वेबिनारमध्ये चर्चा झाली. यामध्ये शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच व्हाव्यात यावर बहुतांश जणांचे एकमत झाले, तर काहींनी ऑनलाईन परीक्षांचा पर्याय सुचविला; परंतु दहावी-बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने तांत्रिक कारणामुळे परीक्षेत व्यत्यय आल्यास याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षण शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. असे असताना परीक्षा ऑनलाईन घेतल्यास असे विद्यार्थी परीक्षांपासून वंचित राहू शकतात, अशी ठोस भूमिकाही काही पालक शिक्षकांनी मांडली. 

दिवाळीनंतरही शाळा सुरू करणे अशक्‍यच; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती - 

या वेबिनारमध्ये शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे, बसंती रॉय, विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक सहभागी झाले होते. यामध्ये परीक्षा घेताना 75 टक्के अभ्यासक्रमाचे दोन भागात विभाजन करून त्यातील एका भागावर असाइनमेंट आधारित परीक्षा, तर दुसऱ्या भागावर लेखी परीक्षा घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र त्यांच्याच शाळेत देण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही, अशी सूचनाही यामध्ये मांडण्यात आली. 

एप्रिल-मेमध्ये परीक्षा घ्याव्यात! 
दर वर्षी परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येतात. यंदा त्या एप्रिल व मे महिन्यात घ्याव्यात. परीक्षा कमी वेळाची असावी, अशी सूचनाही यामध्ये करण्यात आली. याचबरोबर विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेऊ नये, याबाबतही चर्चा झाली. या चर्चेतून आलेल्या महत्त्वाच्या शिफारशी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडे, तसेच सरकारकडे देण्यात येणार आहेत. 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take 10th 12th exam offline only In the webinar of dignitaries in the field of education