'वांद्रे पश्चिम परिसरातील अंमली पदार्थ आणि ड्रग्ज, पब आणि पार्टी' कल्चरवर कारवाई करा; भाजप नेत्याचे आयुक्तांना पत्र

मिलिंद तांबे | Monday, 31 August 2020

ड्रग्ज, पब आणि पार्टी" कल्चरचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात असून त्याविरोधात भाजपाचे वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार अँड.आशिष शेलार यांनी आज पुन्हा भेट घेऊन मुंबई पोलिसांना पत्र लिहून धडक कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या केसच्या तपासात चर्चेत आलेल्या ड्रग्ज, पब आणि पार्टी" कल्चरचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात असून त्याविरोधात भाजपाचे वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार अँड.आशिष शेलार यांनी आज पुन्हा भेट घेऊन मुंबई पोलिसांना पत्र लिहून धडक कारवाईची मागणी केली आहे.

'खासगी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर रुग्णालय दरनियंत्रण प्रस्ताव रखडला'; भाजपची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

मुंबई आणि विशेषत: वांद्रे पश्चिम मतदारसंघातील अवैध अंमली पदार्थांच्या समस्येसंदर्भात मी आपले आज पुन्हा लक्ष वेधत आहे, जे मोठ्या चिंतेचे कारण बनले आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे असे आमदार अँड आशिष शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.सुशांतसिंग राजपूत या तरुणाच दुर्दैवाने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या केसच्या तपासात त्यांच्या मित्रमंडळातील अनियंत्रित अमली पदार्थांचा वापर केल्याचे मीडियातून समोर येत असल्याने पुन्हा एकदा ड्रग्जचा विषय ऐरणीवर आला असल्याचे ही त्यांंनी नमूद केले आहे

सुशांतसिंग राजपूत यांच्या साथीदारांनी वापरलेल्या बेकायदेशीर ड्रग्ज वांद्रेमधील खालील ठिकाणांहून ड्रग्ज टोळ्यांकडून आणल्या गेल्या असाव्यात, अशीही चर्चा आता कानी पडू लागली आहे.त्यामुळे याचे गांभीर्य आता तरी पोलीस प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

वांद्रे मतदारसंघातील बेकायदेशीर अंमली पदार्थांचे अड्डे असलेली खालील ठिकाणे असून त्यावर कारवाई करावी.

1) वांद्रे सी लिंक प्रोमेनेड, आय लव्ह मुंबई परिसर, 

2) वांद्रे पश्चिम, रेक्लेमेशन परिसरात राहुल नगर, नर्गिस दत्त नगर, रंगशारदा हॉटेलच्या समोर आणि मागील बाजू

3) वांद्रे पश्चिम, बीएमसी गार्डन (जनरल अरुणकुमार वैद्य गार्डन) अरुण कुमार वैद्य नगर समोर, 

4) गझदर बांधची खाडीजवळची अवैध झोपडपट्टी 

5) मुरगन चाळ, सांताक्रूझ पश्चिम

6)वांद्रे स्टेशन पश्चिम परिसरातील शास्त्री नगर

7)ओएनजीसी लेन वरीव पब आणि बार, वांद्रे रिक्लेमेशन, 

माझ्या मतदार संघातील या परिसरांची नावासहीत माहिती मी वारंवार देऊन कारवाईची मागणी यापूर्वी ही केली आहे. तरी कृपया पुन्हा आपल्याला मी विनंती करीत असून वांद्रे पश्चिम परिसरात पोलिसांनी धडक मोहीम राबवून अमली पदार्थांचे अड्डे उध्वस्त करावेत. सुशांत सिंह रजपूत प्रमाणे अन्य हजारो तरुणांना या जाळ्यापासून वाचवावे अशी विनंती ही शेलार यांनी केली आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )