विधी प्रवेशाची अतिरिक्त फेरी घ्या! 

file photo
file photo

मुंबई : विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आली असतानाच विद्यापीठांकडून विधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत असतानाच प्रवेशापासून अद्यापही वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाची आणखी एक फेरी राबवण्याची विनंती सीईटी सेलकडे केली आहे. याबाबत सेलकडे 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी लेखी व ई-मेलद्वारे विनंती अर्ज केले आहेत.

राज्यभरातील विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी 15 हजार 100 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी 52 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यातील 18 हजार 597 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता निकषानुसार प्रवेशासाठी दावा केला होता. सीईटी सेलकडून आतापर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्या राबवल्या आहेत. यामध्ये तीन फेऱ्या व एक संस्था स्तरावरील फेरीचा समावेश आहे.

चार फेऱ्यांमध्ये आतापर्यंत आठ हजार 82 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केला आहे; तर अद्यापही तब्बल सात हजार 18 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी विविध कारणांमुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून तसेच ज्यांचे अद्याप एकदाही यादीमध्ये नाव आले नाही अशांकडून आणखी एक फेरी राबवण्याची विनंती सीईटी सेलकडे करण्यात आली आहे. 

100 हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज 
प्रवेशासाठी आणखी एक विशेष फेरी राबवावी, यासाठी 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे अर्ज केले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी दररोज कार्यालयात येऊन प्रवेश फेरी राबवण्याची विनंती करत आहेत. विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यातच विद्यापीठांकडून हिवाळी परीक्षा सत्राचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे सीईटी सेलकडे पुरेसा वेळ नाही. ही बाब लक्षात घेता 19 ते 26 नोव्हेंबरदरम्यान अतिरिक्त फेरी राबवण्याचा विचार सुरू असल्याचे, सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com