मेट्रोविरोधातील पारसींच्या याचिकेवर सुनावणी घ्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

मुंबई - मेट्रो-३ ला विरोध करणाऱ्या पारसी समुदायाच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने (एमएमआरसी) गुरुवारी (ता. २८) उच्च न्यायालयात केली. मेट्रोचे काम दोन अग्यारींपर्यंत आल्याने यावर लवकरच निर्णय होणे गरजेचे आहे, असे एमएमआरसीने न्या. अभय ओक आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाला सांगितले. 

या अर्जावर १७ जुलैला सुनावणी घेतली जाईल. तोपर्यंत संबंधितांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पामुळे अग्यारींचे पावित्र्य भंग होत असून, मेट्रोचा मार्ग बदलावा, असा एकमुखी ठराव पारशी समुदायाने केला आहे. अग्यारीपासून दूरवर भूमिगत मेट्रोचा मार्ग आखता येऊ शकतो, असा दावा करून त्यांनी सुधारित मार्गाचा आराखडाही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सादर केला आहे. पारशी समुदायाच्या ‘द पारसी व्हॉइस’ व ‘वापिझ’ या संघटनांनी चर्चगेट येथे काही दिवसांपूर्वी घेतलेल्या सभेत मेट्रो मार्ग बदलण्याची मागणी एकमताने झाली. ‘द बॉम्बे पारसी पंचायती’नेही याला पाठिंबा दिला आहे. या अग्यारींपासून दूर अंतरावरून मेट्रोचा भूमिगत मार्ग नेता येऊ शकतो. 

आक्षेप काय?
गिरगावमध्ये वाडियाजी व अंजुमन आतश बेहराम या दोन अग्यारी आहेत. या अग्यारींखालून मेट्रोचा मार्ग जातो. भूगर्भातून उत्पन्न होणारी ऊर्जा या अग्यारींसाठी पवित्र असते. मेट्रोमुळे पावित्र्य भंग होईल, असा समुदायाचा मुख्य आक्षेप आहे. 

Web Title: Take a hearing on the Parsi appeal against the Metro