खासदार चिंतामण वनगा अनंतात विलीन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

तलासरी - तब्बल चार दशकांच्या राजकीय जीवनात नैतिक मूल्ये पाळणारे, पालघर जिल्ह्यातील आदिवासींबरोबरच सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळविलेले भाजपचे खासदार ऍड. चिंतामण वनगा (वय 67) यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तलासरी तालुक्‍यातील कवाडा येथे जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांबरोबरच हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत खासदार वनगा यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले.

संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनासाठी दिल्लीत गेलेल्या चिंतामण वनगा यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. त्यानंतर दिल्लीहून आज विमानाने मुंबईत पार्थिव आणण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबरच सरकारी अधिकाऱ्यांनी मुंबईहून तलासरी येथे पार्थिव आणले. तलासरीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक जमले होते. वनगा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तलासरीतील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे आदिवासी विकास राज्यमंत्री रमणभाई पाटकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार कपिल पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, मधुकर पिचड आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कवाडा येथील घरापासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतात खासदार वनगा यांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मुलगा श्रीनिवास व प्रफुल्ल यांच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिंतामण वनगा यांचे स्वप्न भाजप पूर्ण करेल - मुख्यमंत्री
संघर्षातून निर्माण झालेले खासदार चिंतामण वनगा यांचे नेतृत्व होते. अभ्यासू, हुशार आणि वंचित आदिवासी समाजाच्या विकासासाठी कार्य करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक मृत्यूने पालघर जिल्ह्यात व भाजपमध्ये दुःख पसरले आहे. ऍड. वनगा यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्ष कसोशीने प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Web Title: talasari news mumbai news mp chintaman vanga