तळोजा कारागृहातील पोलिस कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

तळोजा कारागृहातील आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी लाच देण्याची मागणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी रंगेहाथ पकडले. 

नवी मुंबई : तळोजा कारागृहातील आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी लाच देण्याची मागणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी रंगेहाथ पकडले. 

प्रदीप शंकर निंबाळकर (वय ४८ वर्षे) असे या लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे. तो तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे कर्तव्यावर आहे. तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला जेलमध्ये चांगली वागणूक देण्यासाठी, मुलाखतीच्या वेळी भेटण्यासाठी आणि त्याला कोर्टात ने-आण करण्याच्या तारखा सुरू ठेवण्यासाठी आरोपीच्या बहिणीकडे 50 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी आरोपीच्या बहिणीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याकडे निंबाळकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर पोलिसांनी तळोजा जेलमध्ये निंबाळकर याच्यासाठी सापळा रचला होता. यानंतर पोलिसांनी निंबाळकरला ठरलेल्या 50 हजार रुपयांपैकी 5 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ठाणे लाच लुचपत विभाग याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taloja Jail Police Personal arrested for taking bribe